नाशिक : “ट्री-म्युझियम” च्या उभारणीसाठी देवराईच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री गडकरी यांची भेट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी)  : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील मोहाडी येथील गोपालकृष्ण सह्याद्री देवराई पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथे जाऊन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. तसेच येथील ट्री-म्युझियम या जैवविविधतापूरक वृक्षलागवड प्रकल्पास सहाय्य मिळणेबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाने सह्याद्री देवराई महाराष्ट्राच्या अंतर्गत मोहाडी, ता. दिंडोरी, जि.नाशिक (महाराष्ट्र) या ठिकाणी ग्रामपालिकेच्या स्वमालकीच्या पडीक जागेवर गेल्या तीन वर्षांपासून लोकसहभागातून निरंतर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन सुरू आहे. येथे आजपर्यंत विविध पर्यावरणपूरक असे एकशे पाच देशी प्रकारातील साडेपाच हजार रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. त्यानुसार देवराई ही परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातदेखील पर्यटनपूरक व्हावी यासाठी त्यामध्ये बायोडायर्व्हसिटी पार्क (Biodiversity Park) जैववैविधताअंतर्गत बाॅटनिकल गार्डन, रॉक गार्डन मेडिटेशन विभाग, बटरफ्लाय गार्डन, प्ले ऐरिया, ग्रीन जिम, कॅक्टस गार्डन, फ्लाॅवर गार्डन, ॲम्पी थिएटर व देवराईमधील तळ्यांचे सुशोभीकरण अशा विविध बाबी उभारण्याचे योजिले आहे. ट्री-म्युझियम उभारणीस शासनस्तरावरून सहाय्य मिळण्याच्या आशयाच्या निवेदनासोबत आराखड्याची प्रत यावेळी देण्यात आली. त्यानुसार संबंधित विभागाकडे निवेदन पाठवून शासनस्तरावरून मदतीसाठी पाठपुरावा करून लवकरच नाशिकला भेट देण्याचे त्यांनी आश्वासित केले आहे. यावेळी देवराई पदाधिकाऱ्यांनी मंत्री गडकरी यांना दुर्मीळ अशा अजान वृक्षाच्या रोपासह नाशिकची प्रसिद्ध बेदाणे भेट देऊन आभार व्यक्त केले.

हेही वाचा:

The post नाशिक : "ट्री-म्युझियम" च्या उभारणीसाठी देवराईच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री गडकरी यांची भेट appeared first on पुढारी.