नाशिक : ट्रॉलीसह चारा जळून खाक

नामपूर www.pudhari.news

नाशिक (नामपूर) : पुढारी वृत्तसेवा
नामपूर-मालेगाव रस्त्यावर मक्याचा चारा वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचा विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने आग लागून चारा जळून खाक झाला. मोराणे पंपाशेजारी बुधवारी (दि.23) ही घटना घडली.

बागलाण तालुक्यातील खिरमाणीचे शेतकरी महेश वर्धमान भदाणे यांनी मोराणे येथील पोलिसपाटील योगेश पाटील यांच्याकडून जनावरांसाठी चारा खरेदी केला होता. हा चारा ट्रॅक्टर ट्रॉलीने मोराणेतून खिरमाणीकडे जात असताना पेट्रोलपंपाशेजारी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या विजेच्या तारांना मक्याच्या चार्‍याचा स्पर्श झाला. तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या उडाल्या. त्यामुळे वाळलेला चारा पेटला. धुराचे लोट पाहून परिसरातील लोकांनी आरडाओरड करून ट्रॅक्टर थांबविले. तत्काळ ट्रॉलीपासून ट्रॅक्टर वेगळा केला, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मुख्य रस्त्यावरच ही घटना घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. सामाजिक कार्यकर्त्यांनी आग शमविण्यासाठी प्रयत्न केले. ट्रॅक्टर वेगळा केल्याने तो बचावला. परंतु, जळालेल्या ट्रॉलीचे नुकसान झाले. सध्या चारा वाहतूक होताना दिसत आहे. तेव्हा वाहनधारकांनी विजांच्या तारांचा अंदाज घेऊनच ट्रॅक्टर चालवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नामदेव सावंत, सम्राट काकडे, शशिकांत कोर, मेघदीप सावंत, रावसाहेब सावंत, प्रवीण अंबासनकर, गणेश बधान यांनी केले आहे.

घटना घडून बराच वेळ झाल्यावर पोलिस पोहोचले, ही बाब खेदजनक आहे. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळेच ही घटना घडली. येत्या दोन दिवसांत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी वीज वितरण समोर आंदोलन करणार आहेत. – आनंदा मोरे, संचालक, बाजार समिती, नामपूर.

हेही वाचा:

The post नाशिक : ट्रॉलीसह चारा जळून खाक appeared first on पुढारी.