नाशिक : ठाकरे गटातील आणखी ११ माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर

शिंदे गट ठाकरे गट,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मागील आठवड्यात ठाकरे गटातून १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करत ठाकरे गटाला मोठा हादरा दिला. यातून ठाकरे गट बाहेर पडत नाही, तोच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानंतर ठाकरे गटातील आणखी ११ माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. असे झाल्यास नाशिकमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला (ठाकरे गट) पुन्हा मोठे खिंडार पडणार आहे.

भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातून अनेक ठिकाणी ठाकरे गटाच्या पदाधिकारी तसेच आजी-माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केले. त्यात नाशिक शहर व जिल्हा अपवाद ठरला होता. त्यामुळे नाशिकमधून कोणीही फुटणार नाही, असा दावाही शिवसेना नेते संजय राऊतांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी छातीठोकपणे केला होता. मात्र, या दाव्यानंतर अवघ्या महिनाभरातच नाशिकमधून ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले, ते १२ माजी नगरसेवकांच्या प्रवेशामुळे. माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह सुदाम डेमसे, सुवर्णा मटाले, रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, ज्योती खोले, चंद्रकांत खाडे, पूनम मोगरे, संगीता जाधव या माजी नगरसेवकांसह अमोल जाधव, प्रताप मेहरोलिया तसेच मनसेचे सचिव भोसले यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या फोडाफोडीच्या राजकारणातून ठाकरे गट सावरत नाही, तोच जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील हेदेखील शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर आता आणखी ११ माजी नगसेवक ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

अधिवेशनानंतर प्रवेश सोहळा

नागपूर येथील राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ३० डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या अधिवेशनानंतर ११ माजी नगरसेवकांचा प्रवेश सोहळा मुंबईत रंगणार आहे. सर्वच मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिवेशनात व्यग्र असल्याने अधिवेशनानंतरचा मुहूर्त काढण्यात आला आहे. प्रभागातील विकासकामांसाठी निधी आणि उमेदवारी या दोन कारणांमुळेच नगरसेवक शिंदे गटात सहभागी होत असल्याचे बोलले जात आहे. ११ माजी नगरसेवकांमध्ये सिडकोतील तीन, नाशिकरोड विभागातील दोन, सातपूर विभागातील दोन, नाशिक मध्यमधील दोन, पंचवटीतील दोन माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : ठाकरे गटातील आणखी ११ माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर appeared first on पुढारी.