नाशिक : डांबरच्या आडून होताेय काळ्या ऑइलचा मारा…गोंदेगाव रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

लासलगाव रस्ता www.pudhari.news
नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
निफाड पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असलेल्या भरवस – वाहेगाव – गोंदेगाव या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ठेकेदाराने मनमानी पद्धतीने काम चालविल्यामुळे रस्त्याची गुणवत्ता आणि दर्जा यांचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे काही वर्षांतच रस्ता उखडणार असल्याचे भाकीत जाणकार सांगत आहेत. ऑइल मिश्रित काळे डांबर ओतून काम चालविले जात असल्याचा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्ते निलेश चिखले यांनी केला आहे. या प्रकाराबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत. तर रस्त्याच्या दर्जाबाबत फोनवरून तक्रार केल्यानंतर देखील एकाही अधिकाऱ्याने येथे भेट दिली नसल्याबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे गुणवत्ता नियंत्रक विभागाकडून चौकशीची मागणी पुढे येऊ लागली आहे.
गोंदेगावमधील शेतकऱ्यांसाठी हा प्रमुख मार्ग आहे. याच मार्गाने शेतमालाची वाहतूक होत असते. लासलगाव, विंचूर, येवला, शिर्डीकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर होतो. अक्षरशः वाट लागलेल्या रस्त्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. खडी पसरून ती व्यवस्थित पद्धतीने दाबणे गरजेचे असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले करून त्यावर घाईत डांबर टाकले गेले आहे. रस्त्याची उंची कमी धरलेली आहे. त्यामुळे पाच महिन्यांतच ती खडी उखडून जाणार आहे. साईड पट्ट्यांमध्ये माती मिश्रित मुरूम असल्याने ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना याचा त्रास होणार आहे. तसेच काम सुरु असल्याच्या कामाची माहिती सांगणारा नामफलक लावलेला नाही. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करत असल्याचा चिखले यांनी आरोप केला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये मंजुरी असलेल्या या कामांचे पैसे वाया जाणार आहेत. रस्ता कामाचा दर्जा सुधारा अन्यथा काम बंद पडू असा इशारा रहिवाशी नागरिकांनी दिला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : डांबरच्या आडून होताेय काळ्या ऑइलचा मारा...गोंदेगाव रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह appeared first on पुढारी.