नाशिक : डिसेंबरच्या प्रारंभीही धरणे काठोकाठ; मिळणार मुबलक पाणी

गंगापूर डॅम www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणे काठोकाठ भरली आहेत. सद्यस्थितीत धरणांमध्ये 97 टक्के उपयुक्त साठा असून, नाशिककरांच्या हक्काचे गंगापूर धरण 94 टक्के भरले आहे. एकूणच धरणांतील उपलब्ध पाणीसाठा बघता जिल्हावासीयांची पुढील जूनपर्यंत तहान भागविताना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळणार आहे.

जिल्ह्यात यंदा ऑक्टोबर एन्डपर्यंत मान्सूनने मुक्काम ठोकला. अनेक तालुक्यांमध्ये सरासरीच्या दीड पट पर्जन्याची नोंद झाली असून, काही भागांत ढगफुटीसद़ृश पाऊस झाला. अखेरच्या टप्प्यातील पावसाने धरणे सलग चौथ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरली आहेत. जिल्ह्यात आजमितीस एकूण 63 हजार 863 दलघफू पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच काळात 62,166 दलघफू (95 टक्के) पाणी होते. जिल्ह्यातील क्रमांक एकचा धरण समूह असलेल्या गंगापूरमधील चारही प्रकल्प मिळून 9 हजार 361 दलघफू म्हणजे 92 टक्के साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नाशिककरांची पुढील मान्सूनपर्यंतची पाणीचिंता सरली आहे. इगतपुरीतील दारणा समूहातील सहाही प्रकल्प मिळून एकूण पाणीसाठा 18 हजार 215 दलघफू इतका साठा आहे. त्याचे प्रमाण 96 टक्के आहे. पालखेड व ओझरखेड समूहातील प्रत्येकी तिन्ही धरणे मिळून अनुक्रमे 8176 आणि 3136 दलघफू पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी 98 एवढी आहे. तर भोजापूर 93 टक्के भरले आहे. गिरणा खोर्‍यातील चणकापूर समूहातील पाच समूह पूर्ण क्षमतेने भरली असून, त्यात 23 हजार 1 दलघफू पाणी आहे. पुनदचे दोन्ही प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेत प्रमुख धरणांमधून पुढील वर्षापर्यंत पिण्याच्या पाण्याचे आरक्षण मंजूर झाले आहे. त्यामुळे उर्वरित पाण्यामधून सिंचन व औद्योगिक वसाहतींसाठी मागणी पूर्ण होणार आहे.

धरणसाठा (दलघफूमध्ये)
गंगापूर                     5311
दारणा                      6942
काश्यपी                   1827
गौतमी                      1462
आळंदी                      761
पालखेड                     595
करंजवण                  5309
वाघाड                     2272
ओझरखेड                2095
पुणेगाव                     598
तिसगाव                    443
भावली                    1420
मुकणे                     6839
वालदेवी                  1123
कडवा                    1652
नांदूरमध्यमेश्वर           239
भोजापूर                   334
चणकापूर                2427
हरणबारी                1149
केळझर                   534
नागासाक्या               391
गिरणा                  18500
पुनद                     1306
माणिकपुंज             334

हेही वाचा:

The post नाशिक : डिसेंबरच्या प्रारंभीही धरणे काठोकाठ; मिळणार मुबलक पाणी appeared first on पुढारी.