नाशिक : डॉ. प्राची पवारांवरील हल्ल्याचा अखेर उलगडा

प्राची पवार, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाबाधित असलेल्या आत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने भाच्याने दोघांना सुपारी देत दिवंगत डॉ. वसंत पवार यांच्या कन्या असलेल्या डॉ. प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातून तिघा संशयितांना अटक केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि. १३ डिसेंबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास हल्लेखोरांनी गोवर्धन शिवारात पवार फार्मस‌्च्या प्रवेशद्वारावर डॉ. प्राची पवार यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता.

अभिषेक दीपक शिंदे (१९, रा. कलानगर, गंगापूर रोड), धनंजय अजय भवरे (१९, रा. ता. देवळा, सध्या रा. दिंडोरी रोड), पवन रमेश सोनवणे (२२, रा. लोहोणेर, ता. सटाणा, सध्या रा. सातपूर कॉलनी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. डॉ. प्राची पवार यांच्यावर गोवर्धन शिवारात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला होता. हल्ला केल्यानंतर संशयित पसार झाले होते. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिस अधीक्षक उमाप, अपर अधीक्षक माधुरी कांगणे-केदार, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, कविता फडतरे यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी १० पोलिस अधिकारी व ४० अंमलदारांची दहा पथके तयार करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहिती, संशयितांच्या वर्णनाच्या आधारे तिघा संशयितांना पकडले आहे. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाहनावरून पडल्याने पोलिसांच्या जाळ्यात
हल्लेखाेरांनी डॉ. पवार यांच्यावर हल्ला केल्यानंतर शहराच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले होते. त्याचप्रमाणे शहरात येत असताना तिघांचा अपघात झाल्याने ते जखमी झाल्याचेही पोलिसांना प्राथमिक तपासात समजले. त्यानुसार पोलिसांनी त्यादृष्टीने तपासास सुरुवात केली. संशयितांचे वर्णन, त्यांचे कपडे, वाहनावरून शोध सुरू ठेवला. तसेच तिघांनी दुखापत झाल्याने रुग्णालयात उपचार घेतल्याचे पोलिसांना समजताच त्यानुसार पोलिसांनी तिघा संशयितांना पकडले.

…यामुळे केला हल्ला
संशयित अभिषेक शिंदे याची आत्या कोरोनाबाधित झाल्याने तिच्यावर पंडित कॉलनी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा उपचारादरम्यान १२ मे २०२१ रोजी मृत्यू झाला होता. याचा राग अभिषेकला होता. त्यामुळे डॉ. पवार यांना अद्दल घडवण्याच्या हेतूने अभिषेकने हल्ल्याचा कट रचला. त्यासाठी त्याने धनंजय व पवन या दोघांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची सुपारी दिली. अभिषेकने भद्रकाली परिसरातून धारदार चॉपर खरेदी केला होता, असे तपासात उघड झाल्याचे अधीक्षक उमाप यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : डॉ. प्राची पवारांवरील हल्ल्याचा अखेर उलगडा appeared first on पुढारी.