नाशिक : डॉ. सैंदाणेला जोडीदारासह पाच दिवसांची पोलिस कोठडी

लाचखोरांना कोठडी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पोलिसांना आंतरजिल्हा बदल्यांसाठी आजारपणाचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या खासगी डॉक्टर स्वप्निल सैंदाणे याच्यासह त्याचा जोडीदार विवेक ठाकरे यास नाशिक तालुका पोलिसांनी मंगळवारी (दि.२७) ताब्यात घेतले होते. त्या दोघांनाही न्यायालयाने सोमवार (दि. ३)पर्यंत पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अटक संशयितांची संख्या चार झाली आहे. तर जिल्हा शासकीय रुग्णालयातील दोन्ही तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

डॉ. स्वप्निल सैंदाणे याचे शिक्षण बीएएमएस असले तरी तो एमडी सर्जन असल्याचे भासवून पोलिसांना वैद्यकीय प्रमाणपत्र देत असल्याचे समोर आले आहे. डॉ. सैंदाणे याने बंद रुग्णालयासह चार खासगी रुग्णालयांच्या नावे बनावट अहवाल दिल्याचा ठपका त्याच्यावर आहे. तर संशयित विवेक ठाकरे हा या गैरव्यवहारात साथीदार असल्याने त्यासही अटक केली आहे. बुधवारी नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने दोघांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली. त्यांच्याकडून प्रमाणपत्रांची माहिती जाणून घेतली जात असून, इतर संशयितांसोबत त्यांचा संंबंध कसा आला व प्रमाणपत्र वितरित कसे केले, याबाबत पोलिस माहिती जाणून घेत आहेत. डॉ. स्वप्निलने प्रभावती (पूर्वीचे ‘स्पंदन’ नाव), साईछत्र, गणेश मल्टिस्पेशालिस्ट या रुग्णालयांच्या नावे प्रमाणपत्रे दिल्याचे समोर येत आहे. यापैकी साईछत्र हे रुग्णालय कोरोना काळापुरतेच सुरू होते. दरम्यान, सहजीवन रुग्णालयाच्या नावे अहवाल देणारे संशयित डॉ. वीरेंद्र यादव यांच्यासह तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, डाॅ. किशोर श्रीवास यांच्यासह इतर संशयितांभोवती अटकेची टांगती तलवार कायम आहे.

डॉ. निखील सैंदाणेंच्या जामिनावर सहाला सुनावणी

जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे यांच्या उच्च न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्जावर ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. तर डॉ. किशोर श्रीवास आणि लिपिक किशोर पगारे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने पोलिस दोघांचाही माग काढत आहेत. डॉ. निखील सैंदाणे हे कुटुंबीयांसह नॉट रिचेबल असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : डॉ. सैंदाणेला जोडीदारासह पाच दिवसांची पोलिस कोठडी appeared first on पुढारी.