नाशिक : ढोलच्या तालावर थिरकले शिवसैनिक; फटाक्यांची आतषबाजी

ढोलच्या तालावर नाचले शिवसैनिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अधिकृत शिवसेनेचा दर्जा देताना धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांच्या संभाजी चौकातील संपर्क कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी तसेच ढोलच्या तालावर ठेका धरत शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि.१७) मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वामधील पक्षाला अधिकृत शिवसेनेचे नाव देताना धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले. आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांचे कार्यालय गाठले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, अरे आवाज कोणाचा शिवसेनेचा’ आदी घोषणा दिल्या. तसेच एकमेकांना पेढे भरवित विजयोत्सव साजरा केला. महिला शिवसैनिकांनी फुगड्या घालत आनंद व्यक्त केला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व भाऊलाल तांबडे, बंटी तिदमे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा हा विजय आहे. शिवसेनेची स्थापना हिंदुत्वाने झाली. गेल्या काही वर्षांत काॅंग्रेस व राष्ट्रवादीसोबत गेल्याने विचार भरकटले. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे कार्य केले असून, निवडणूक आयोगाचे आभार. खासदार संजय राऊत दुर्दैवी आहे. त्यांच्या विचारांमुळे आमच्या खऱ्या परिवाराची वाट लागली. राज्यातील भरकटलेले शिवसैनिक आता या खऱ्या शिवसेनेसोबत येतील.

– हेमंत गोडसे, खासदार, शिवसेना

सत्य परेशान हो सकता हे लेकीन पराजीत नही, हे आज स्पष्ट झाले. खऱ्या अर्थाने आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली. त्यांनी दिलेल्या हिंदुत्व व विचारांचा वारसा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करत आहेत. कायद्यात सर्व बसत होते तरी सर्व गोष्टींसाठी प्रतीक्षा करावी लागली. आता खऱ्या भगव्याचा झंझावात राज्यभर दिसेल.

– अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना

महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आज न्याय मिळाला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनाही आज आनंद झाला आहे. शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्वाचे विचार जागे ठेवण्याचे कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंगावर घेऊन केले. ना. शिंदे यांच्या नेतृत्वात या पुढे राज्यात शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे टिकवून ठेवण्याचे काम शिवसैनिक करतील.

– भाऊलाल तांबडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

हेही वाचा : 

The post नाशिक : ढोलच्या तालावर थिरकले शिवसैनिक; फटाक्यांची आतषबाजी appeared first on पुढारी.