नाशिक : ढोल-ताशांच्या निनादात आज विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना

गणेश प्रतिष्ठापना मुहूर्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर बुधवारी (दि. 31) वाजत-गाजत गणरायाचे आगमन होणार आहे. ढोल-ताशांचा निनाद, बँड पथकातील कलाकारांचे मधूर वादन अशा जल्लोषात छोटेखानी मिरवणूक काढून घरोघरी विघ्नहर्त्याची मनोभावे प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. दोन वर्षांची मरगळ झटकून गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त असे सारेच गणरायाचे स्वागत करणार असल्याने, शहर व परिसरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण बघावयास मिळत आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा  लागला होता. या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी प्रतिष्ठापनेसाठी गणेशभक्त उत्सुक आहेत. गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठेमध्येही चैतन्याची लाट पसरलेली असून, श्रींच्या आगमनावर मोठ्या प्रमाणात उलाढाल होण्याची शक्यता आहे. गणरायाचे आगमन जरी बुधवारी होत असले, तरी सार्वजनिक मंडळांनी गणरायाच्या भव्य मूर्ती अगोदरच मंडळस्थळी आणल्याने ‘गणपत्ती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने नाशिकनगरी निनादली आहे.

अशी करा पूजेची तयारी

गणेशाची छोटी मूर्ती, श्रीफळ, कापड, कापसाची माळ, हार, सुटी फुले व नाणी, अत्तर, गूळ-खोबरे, सुपारी, देठाची पाने, मिठाई, मोदक, कापसाचे वस्त्र, अगरबत्ती, कापूर, दूर्वा, हळदी-कुंकू-अबीर-गुलाल, दिवा, तेल, समई, वाती, फळे, पंचामृत, नैवेद्य, चंदन, अष्टगंध, पळी, पंचपात्र, जानवे, शमीपत्रे, आंब्याची डहाळी, ताह्मण, कलश, शंख, घंटा, अक्षता आदी साहित्य पूजेसाठी आवश्यक आहे.

बाप्पाची मुर्ती घरी आणण्याचे मुहूर्त

सकाळी 11 वाजून 45 मिनिटे ते दुपारी 1 वाजून 58 मिनिटे (स्थिर वृश्चिक लग्न), सकाळी 11 ते दुपारी 12 वाजून 30 मिनिटे (लाभ), दुपारी 12 वाजून 30 मिनिटे ते दुपारी 2 वाजता (अमृत), सायंकाळी 5 वाजून 55 मिनिटे ते सायंकाळी 7 वाजून 33 मिनिटे (स्थिर कुंभ लग्न), रात्री 8 ते 9 वाजून 30 मिनिटे (लाभ)

हेही वाचा :

The post नाशिक : ढोल-ताशांच्या निनादात आज विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना appeared first on पुढारी.