नाशिक : तंबाखूजन्य पदार्थांची शाळा परिसरात विक्री केल्यास होणार कारवाई

तंबाखू,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्र शासनाच्या तंबाखूमुक्त शाळा धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महापालिका आणि शहरातील खासगी शाळांमध्ये महापालिकेच्या शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे सूचना जारी केल्या असून, शाळांच्या 100 मीटर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढत असून, त्याचे परिणाम तरुणांमध्ये जास्त होताना दिसत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आणि तरुणांना तंबाखू सेवनाच्या विळख्यातून बाहेर काढण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने तंबाखूमुक्त शैक्षणिक धोरण जाहीर करत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या धोरणानुसार शैक्षणिक संस्थांच्या शाळेच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना आढळून आल्यास अशा संंबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाने केंद्र सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने परिपत्रक जारी करत त्याचे पालन करण्याची सूचना केली आहे.

तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदीबरोबरच शाळांच्या परिसरामध्ये धूम—पानासदेखील बंदी घालण्यात आली आहे. तसेच तंबाखूजन्य पदार्थ सेवन न करण्याबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. महापालिका तसेच खासगी शाळांनी स्वयंमूल्यांकन करण्याची सूचना करत 90 गुण मिळणार्‍या शाळांना तंबाखूमुक्त शाळा म्हणून जाहीर केले जाणार आहे. शैक्षणिक संस्थांनी धोरणाची कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहन मनपा प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : तंबाखूजन्य पदार्थांची शाळा परिसरात विक्री केल्यास होणार कारवाई appeared first on पुढारी.