नाशिक : तब्बल तेरा वर्षे शेतकरी मोबदल्याविनाच

कळवण डावा कालवा www.pudhari.news

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा
कळवण पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येणार्‍या सुळे डावा कालव्याच्या पाटचारीसाठी तालुक्यातील अकरा गावांतील जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र, 13 वर्षे उलटूनही शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. मोजक्याच शेतकर्‍यांना तुटपुंज्या स्वरूपात मोबदला दिला आहे. वंचित लाभार्थी शेतकर्‍यांना सरसकट नवीन दराप्रमाणे मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सहायक अभियंता रोहित पवार यांना निवेदन देण्यात आले.

पुनंद प्रकल्पामुळे बिजोरे, गांगवण, गणोरे, ककाणे, शेरीदिगर, भुताणेदिगर, विसापूर, दरेभणगी, भादवण, पिळकोस, चाचेर या 11 गावांसह अनेक गावांतील शेतकर्‍यांना पाण्याचा लाभ झाला आहे. मात्र, या धरणाच्या पाटचारीसाठी ज्या शेतकर्‍याच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, त्या शेतकर्‍यांना पाटबंधारे विभाग व भूसंपादन अधिकार्‍यांकडून अद्याप मोबदला अदा करण्यात आलेला नाही. मोबदल्यासाठी पाटबंधारे विभागाच्या कळवण कार्यालयाचे उंबरठे झिजवून शेतकरी हतबल झाले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधीही त्यांच्या मागणीकडे दर्लक्ष करीत असल्याने त्यांनी आठ दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेत आपली कैफियत मांडली होती. त्या अनुषंगाने पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार आज पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता रोहित पवार यांच्या कार्यालयात बाळासाहेबांची शिवसेना कळवण तालुक्याचे पदाधिकारी जितेंद्र पगार, संदीप पगार व प्रकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांसमवेत संयुक्त बैठक पार पडली. वंचित शेतकर्‍यांना तत्काळ मोबदला द्यावा, अशी मागणी मोकभणगी, देसराणे, बिजोरे, विसापूर, चाचेर, भादवण, गांगवण, पिळकोस या गावांतील 150 ते 200 शेतकरी बांधवांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : तब्बल तेरा वर्षे शेतकरी मोबदल्याविनाच appeared first on पुढारी.