Site icon

नाशिक : तासिका प्राध्यापकांचे 26 पासून कामबंद आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शासनाच्या 100 टक्के प्राध्यापक पदभरती व इतर आर्थिक मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नेट, सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीने महाराष्ट्रभर कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापक दि. 26 डिसेंबरपासून आंदोलनात सहभागी होणार आहेत. ऐन परीक्षांच्या काळातच तासिका तत्त्वावरील प्राध्यापक संपावर जाणार असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होण्यासह परीक्षांचे निकालही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण – 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करावी यासाठी महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांची 100 टक्के भरती करणे आवश्यक आहे. मात्र, शासनाकडून त्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. यासंदर्भात नेट, सेट, पीएच.डी.धारक संघर्ष समिती गेली अनेक वर्षे सातत्याने निवेदने, पदयात्रा, उपोषणे, सत्याग्रह आंदोलने, प्रशासकीय बैठकांच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहे. शासनाकडून ठोस स्वरूपाचा निर्णय होत नसल्याने समितीने 100 टक्के प्राध्यापक भरतीसाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना परीक्षेची कामे न देण्याचा शासन निर्णय काढला. त्यामुळे राज्य शासनानेच 17 ऑक्टोबरला काढलेल्या शासन निर्णयाचे उल्लंघन करून परीक्षा काळात तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन पूर्णपणे बंद असल्याचा आरोप करत संघर्ष समितीने राज्य शासनाविरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला. दरम्यान, महिनाभरापासून या विषयावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे वेळ मागत आहे. मात्र, अद्याप शासनाने संघर्ष समितीला वेळ दिलेला नाही किंवा प्रश्न सोडवलेले नाहीत, असे संघर्ष समितीकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : तासिका प्राध्यापकांचे 26 पासून कामबंद आंदोलन appeared first on पुढारी.

Exit mobile version