नाशिक : तासिका शिक्षकांना मिळणार आता 42 वरून 120 रुपये

शाळा तासिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्त्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. माध्यमिक शाळांतील शिक्षकांना घड्याळी तासिकांनुसार 120 रुपये, तर कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना 150 रुपये मानधन मिळणार आहे. तब्बल 16 वर्षांनंतर मानधनात वाढ होणार असल्याने शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 डिसेंबरपासून करण्यात येणार आहे.

राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून एखाद्या विषयासाठी अध्यापनाची शैक्षणिक अर्हताप्राप्त करणार्‍या शिक्षकांची घड्याळी तासिकेनुसार मानधनावर नियुक्ती करण्यात येते. माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील घड्याळी तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे मानधन सन 2006 मध्ये ठरविण्यात आले होते. माध्यमिकला 42 रुपये आणि कनिष्ठ महाविद्यालयासाठी 72 रुपये दर निश्चित केला होता. त्यानंतर आता 16 वर्षांनी शिक्षकांच्या मानधनाचे दर वाढवण्यास शासनाने हिरवा कंदील दर्शविला आहे. मानधनवाढीच्या निर्णयाचा राज्यातील सुमारे 10 हजार शिक्षकांना फायदा होणार आहे. दरम्यान, घड्याळी तासिका तत्त्वावर नियुक्त करण्यात येणारे शिक्षक पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे असावेत. पात्रतेचे निकष पूर्ण नसलेल्या शिक्षकांची घड्याळी तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात येऊ नये, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मानधनावरील शिक्षकांची नियुक्ती करताना शैक्षणिक संस्थाचालकांना आवश्यक खबरदारी घ्यावी लागणार आहे.

खासगी शिकवणीकडे ओढा कायम
बीएड – डीएड यासारखे अध्यापन अभ्यासक्रम पूर्ण करताना विद्यार्थ्यांचा मोठा खर्च होत असतो. पात्रताधारक झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना नोकरीसाठी वणवण करावी लागते. शैक्षणिक संस्थाचालकांकडून अतिशय तुटपुंजे मानधन मिळत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी खासगी शिकवणीचा पर्याय निवडला आहे. संस्थेत महिन्याकाठी 10 ते 12 हजारांचे मानधन मिळत असल्याने त्यांचा खासगी शिकवणीकडे ओढा वाढला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : तासिका शिक्षकांना मिळणार आता 42 वरून 120 रुपये appeared first on पुढारी.