नाशिक : तीनच आठवड्यांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची शंभरी

swine flue

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाची लाट ओसरत नाही तोच जीवघेणा डेंग्यू येऊन धडकला. त्यात स्वाइन फ्लूनेही हातपाय पसरले असून, अवघ्या तीनच आठवड्यांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांनी शंभरी गाठली आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वाइन फ्लूचा वेग कोरोना, डेंग्यूपेक्षा अधिक असल्याने चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिन्याच्या तीन आठवड्यांत शहरात स्वाइन फ्लूचे 106 रुग्ण आढळले असून, त्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये 49 रुग्ण स्वाइन फ्लूवर उपचार घेत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शहरात स्वाइन फ्लूचा धोका वाढला असून, वैद्यकीय विभाग अलर्टवर आला आहे. दरम्यान, वैद्यकीय विभागाने तीन रुग्णांच्या मृत्यूनंतर खासगी रुग्णालयांना पत्र पाठवून स्वाइन फ्लू आणि डेंग्यूच्या संशयित तसेच बाधित रुग्णांची माहिती कळवणे बंधनकारक केले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे. गेल्या जुलै महिन्यापासून शहरात स्वाइन फ्लूने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी ते एप्रिलपर्यंत शहरात स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. परंतु, पावसाळा सुरू होताच जूनमध्ये शहरात दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर जुलैमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली. तर 1 ते 21 ऑगस्टदरम्यान तब्बल 106 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या तीन महिन्यांत शहरातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांचा आकडा 130 वर पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

खासगी रुग्णालयांना पत्र
शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेता मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरातील खासगी रुग्णालये तसेच लॅबमध्ये डेंग्यू आणि स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण आणि बाधित रुग्णांसदर्भातील दैनंदिन अहवाल पालिकेला सादर करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार वैद्यकीय विभागाने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना पत्र लिहून दैनंदिन स्वाइन फ्लू आणि डेंग्यूची माहिती कळवणे बंधनकारक केल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : तीनच आठवड्यांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची शंभरी appeared first on पुढारी.