नाशिक : तीन वर्षांनी झाली ‘झूम’; २० मिनिटांत उद्योजकांची ‘धूम’

उद्योजक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे उद्योजकांचे प्रश्न जटील झाले असून, ते सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरलेल्या जिल्हा उद्योगमित्र अर्थात ‘झूम’च्या बैठकीला गुरुवारी (दि. ६) मुहूर्त लागला खरा, पण जिल्हाधिकाऱ्यांसह वेगवेगळ्या विभागांचे प्रमुख अधिकारीच बैठकीला अनुपस्थित असल्याने उद्योजकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. परिणामी अवघ्या २० मिनिटांतच बैठक आटोपती घ्यावी लागली.

झूम बैठकीचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी रजेवर असल्याने ते बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याचे अगोदरच स्पष्ट झाले होते. त्यांच्या अनुपस्थितीत अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठकीची सूत्रे त्यांनी सोपविली होती. त्यामुळे ही बैठक वादळी ठरेल अशी शक्यता वर्तविली जात होती. त्यात महापालिका, जिल्हा परिषद तसेच पोलिस प्रशासनातील प्रमुख अधिकारी गैरहजर राहिल्याने बैठकीची केवळ औपचारिकता पाळली जात असल्याने उद्योजकांनी बैठकीवर बहिष्कार टाकत काढता पाय घेतला. प्रारंभी मागील बैठकीच्या इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेताना सुरुवातीच्या पाच विषयांवर चर्चा झाली. पहिले दोन विषय एमआयडीसीशी निगडीत असल्याने, उपस्थित असलेले एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी त्याबाबतची माहिती दिली. मात्र त्यानंतरच्या विषयाशी संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याने, ‘निरोप देऊ’ अशी गुळमुळीत उत्तरे समोर येऊ लागल्याने उद्योजकांचा संताप अनावर झाला. निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी, अशाप्रकारचे निरोप दिले जात असतील, तर उद्योजकांचे प्रश्न कसे मार्गी लागतील? असा प्रश्न उपस्थित केला. प्रमुख विषयांना बाजूला ठेवून पावसाळी गटारे, कुंपण, देखभाल दुरुस्ती यावरच चर्चा होत असेल, तर बैठकीला अर्थ काय? अशा शब्दांत आपला रोष व्यक्त केला. तसेच ज्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांसह इतर प्रमुख अधिकारी उपस्थित असतील त्या दिवशी बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी करत काढता पाय घेतला. त्यानंतर इतरही उद्योजकांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्याने अखेर बैठक गुंडाळावी लागली. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, महाजन यांच्यासह काही अधिकारी उपस्थित होते. तर उद्योजकांमध्ये निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बुब, महाराष्ट्र चेंबरचे संजय सोनवणे, कैलास पाटील, कैलास आहेर, जयप्रकाश जोशी, गाेविंद झा, रवींद्र झोपे आदी उपस्थित होते.

जुने ३०, नवे २१ विषय
दि. १८ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या बैठकीत सादर केलेल्या एकूण ३० विषयांचा आढावा या बैठकीदरम्यान घेतला जाणार होता. याव्यतिरिक्त २१ नवीन विषय बैठकीत मांडले जाणार होते. मात्र, अधिकारीच अनुपस्थित असल्याने एकाही विषयावर समर्पक चर्चा होऊ शकली नाही.

बैठकीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारीच बैठकीला अनुपस्थित असल्याने उद्योजकांची निराशा झाली. आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकणार होतो, मात्र अधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव आम्ही हजर राहिलो. पण त्या ठिकाणी प्रमुख अधिकारी नसल्याने आणखी निराशा झाली. उद्योजकांचे असंख्य प्रश्न असून, ते तातडीने सोडवण्याची गरज आहे. – धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा.

झूम बैठक तातडीने घेतली जावी, याकरिता उद्योगमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले होते. मात्र, अशातही प्रशासनाला बैठकीचे फारसे गांभीर्य असल्याचे दिसून आले नाही. अशा बैठका घेतल्या जात असतील, तर उद्योजकांचे प्रश्न कसे सोडवले जातील? अशाने औद्योगिक विकास खुंटेल. संजय सोनवणे, को-चेअरमन, महाराष्ट्र चेंबर.

The post नाशिक : तीन वर्षांनी झाली 'झूम'; २० मिनिटांत उद्योजकांची 'धूम' appeared first on पुढारी.