नाशिक : तुम्हीच सांगा, स्वामित्व ‘धन’ भरायचे कोठून?

गौणखनिज www.pudhari.news

सिन्नर : संदीप भोर
अवैध गौणखनिज उत्खनन व साठा प्रकरणी तहसीलदारांनी वडांगळी ग्रामपंचायतीला 1 कोटी 16 लाखांच्या दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली व यासंदर्भात ग्रामपंचायतीकडून तीन दिवसांत खुलासा मागवला होता. त्याप्रमाणे सरपंच मीनल खुळे व पदाधिकार्‍यांनी तहसीलदारांना खुलासा सादर केला आहे. या प्रकाराची किंचितही कल्पना नाही आणि सूतराम संबंधही नाही.तर शासनाला स्वामित्वधन भरायचे कोठून असा ‘रॉयल’ सवाल खुलाशात करण्यात आला आहे.

वडांगळी ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतीच्या मालकी गटात अवैध वाळूसाठा आढळल्यानंतर तहसीलदार एकनाथ बंगाळे यांनी दिलेल्या नोटिसीची तालुकाभरात चर्चा सुरू आहे. वाळूमाफीयांना मोकाट सोडून ग्रामपंचायतीला वेठीस धरल्याच्या या प्रकाराने ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रशासन प्रचंड संतापले आहे. तथापि, ग्रामपंचातीने अवैध गौणखनिज उत्खनन व वाळूसाठा प्रकरणी विहीत मुदतीत खुलासा तहसीलदारांना सादर केला. सदर वाळूचा साठा हा अज्ञात व्यक्तींनी स्वत:च्या फायद्यासाठी अंधारात केलेला असावा. त्यामुळे याबाबतीत आम्हाला काहीही माहीत नसल्याचे खुलाशात म्हटले आहे. जर वाळूसाठा केलेला आहे ग्रामपंचायतीने उत्खनन व साठा करण्याची कोणालाही परवानगी दिलेली नाही अथवा ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी यांचा काहीही संबंध नाही, मग आपण मागत असलेले स्वामित्वधन शासनाला भरण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पुढे अधोरेखित करण्यात आले आहे. दोषींवर आपल्या स्तरावरून कारवाई करावी आणि ग्रामपंचायतीची मान या जोखडातून मोकळी करावी, अशा आशयाची विनंतीही पत्रात केली आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.13) खुलासा सादर करण्यास गेलेले ग्रामपंचायत पदाधिकारी व तहसीलदार यांच्यात चांगली शाब्दिक चकमक झडल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : तुम्हीच सांगा, स्वामित्व ‘धन’ भरायचे कोठून? appeared first on पुढारी.