नाशिक : तोटा झालेल्या सिटीलिंकचा महापालिकेच्या तिजोरीवर डोळा

सिटीलिंक बससेवा, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिटीलिंक शहर बससेवेला होणारा तोटा भरून काढण्यासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात ८५ कोटींची तरतूद करण्याची मागणी नाशिक महानगर परिवहन महामंडळाने मनपा प्रशासनाकडे केली आहे. शहर बससेवेचा वाढता विस्तार आणि बसेसची वाढलेली संख्या यामुळे मनपा बससेवेच्या तोट्यात वाढ झाली आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी तरतूद करण्याबरोबरच सिटीलिंक विविध उपाययोजना करणार आहे.

महापालिकेने ८ जुलै २०२१ पासून शहर बससेवेला टप्प्याटप्प्याने सुरुवात केली. आजमितीस सुमारे २५० बसेस विविध मार्गांवर प्रवासी सेवा करत आहेत. नाशिककरांचा सिटीलिंक बसेसला वाढता प्रतिसाद असला तरी ही सेवा सध्या तरी तोट्यात आहे. सिटीलिंकच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या बसेसकरिता प्रतिकिमी ७५ रुपयांचा खर्च होत आहे. तर, तिकीट विक्रीतून ४५ रुपये प्रतिकिमी महसूल मिळत आहे. त्यामुळे प्रतिकिमी सिटीलिंकला ३० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात सिटीलिंकला २० कोटी २१ लाखांचा तोटा सहन करावा लागला आहे. प्रवासी पासच्या दरात २५ टक्के दरवाढ करून तोटा कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. इतरही उपाययोजना केल्या जात आहेत. तोटा भरून काढण्याची जबाबदारी मनपाकडे असल्याने २०२२-२३ साठी सिटीलिंकने मनपाकडे ७० कोटींची मागणी केली होती. मात्र, मनपाने अंदाजपत्रकात ५० कोटींची तरतूद केली होती. गेल्या वर्षभरात सिटीलिंक बसेसची संख्या १५० वरून २५० पर्यंत गेल्याने तोट्यात वाढ झाली आहे. २०२२-२३ मध्ये ७० कोटींपर्यंत तोटा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिटीलिंकने नव्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात ८५ कोटींची मागणी केली आहे.

केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामअंतर्गत नाशिक मनपाने दोन टप्प्यात ५० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. या ई-बसच्या माध्यमातून प्रतिकिमी खर्च ७५ रुपयांवरून ६० रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो. त्यामुळे ई-बस मनपाला फायदेशीर ठरू शकतात.

हेही वाचा :

The post नाशिक : तोटा झालेल्या सिटीलिंकचा महापालिकेच्या तिजोरीवर डोळा appeared first on पुढारी.