नाशिक : ‘तो’ मृत्यू न्यूमोनियामुळेच, तारांगणपाड्याला सीईओंनी दिली भेट

सीईओ भेट,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील तारांगणपाडा या गावातील 51 ग्रामस्थांना एकाच वेळी उलट्या जुलाब सुरू झाल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. त्यापैकी काही ग्रामस्थांना नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू हा प्राथमिक लक्षणे बघितले असता अतिसारामुळे झाले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले होते. मात्र, संबंधित मृताचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर न्यूमोनियाने झाला असल्याचे समोर आले आहे. एकाच वेळी एकाच गावात एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांना त्रास होत असताना तालुका वैद्यकीय प्रशासन अशी माहिती का देत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

दरम्यान, या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. कपिल आहेर यांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सद्यस्थितीला 11 रुग्ण याठिकाणी उपचार घेत आहेत.

या गावचे ग्रामस्थ पिण्यासाठी दोन हातपंपांच्या पाण्याचा वापर करतात. हातपंपातील दूषित पाण्यामुळे 51 व्यक्तींना उलट्या जुलाब आजाराची लागण झाली. त्यातील 30 रुग्ण हे घरीच उपचार घेऊन बरे झाले. उर्वरित 11 रुग्णांना तत्काळ इगतपुरी प्रेरणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, एका व्यक्तीला जास्त झाल्यामुळे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. सकू बुधा मेंगाळ (45, रा. तारांगणपाडा, ता. इगतपुरी) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार मृत्यूची प्राथमिक लक्षणे अतिसाराची आहेत, तर रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या व्यक्तीचा न्यूमोनियामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच गावातील हातपंपाचे नमुने लॅबकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. यातून आजाराचे खरे कारण स्पष्ट होईल.

हेही वाचा :

The post नाशिक : ‘तो’ मृत्यू न्यूमोनियामुळेच, तारांगणपाड्याला सीईओंनी दिली भेट appeared first on पुढारी.