Site icon

नाशिक : ‘त्या’ पाचही विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
पुणे महामार्गावरील सिन्नर येथील मोहदरी घाटात कारचे टायर अचानक फुटून झालेल्या भीषण अपघातात ठार झालेल्या सिडकोतील पाचही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संगमनेर येथे मित्राचा विवाह सोहळा उरकून नाशिककडे परतताना पुणे महामार्गावरील सिन्नर येथील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि.9) दुपारच्या सुमारास कारचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये सिडको भागातील दोन विद्यार्थी व एक विद्यार्थिनी, तर राणेनगर व पाथर्डी फाटा येथील दोन विद्यार्थिनींचा समावेश होता.

हर्ष दीपक बोडके (17, रा. कामटवाडे) याच्यावर कामटवाडे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तो भोसला महाविद्यालयात इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत शिकत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, 12 वर्षांचा भाऊ आहे.

शुभम बारकू तायडे (17, रा. शिवशक्ती चौक, सिडको) याच्यावर मोरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले तो केटीएचएम महाविद्यालयात इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत शिकत होता. त्याच्या पश्चात आई व लहान भाऊ असा परिवार आहे.

प्रतीक्षा दगू घुले (17, रा. पाथर्डी फाटा) हिच्यावर पाथर्डी गाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ती केटीएचएम महाविद्यालयात इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत शिकत होती. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.

सायली अशोक पाटील (17, रा. राणेनगर) हिच्यावर मोरवाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तीदेखील केटीएचएममध्ये इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत शिकत होती. तिच्या पश्चात आई, वडील आहेत.

मयूरी अनिल पाटील (16, रा. त्रिमूर्ती चौक) ही औरंगाबाद रोडवरील ओढा येथील मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमाचे शिक्षण घेत होती. तिच्यावर नामपूर या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘त्या’ पाचही विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Exit mobile version