नाशिक : ‘त्या’ भाविकाचा घातपातच; निव्वळ मोबाइलवरून केला खून

नाशिक (सटाणा)  : पुढारी वृत्तसेवा
नांदुरी येथील सप्तशृंगीदेवीच्या चैत्रोत्सवासाठी खानदेशातून पायी जाणार्‍या एका भाविकाचा मृतदेह ब्राह्मणगाव शिवारात आढळला होता. हा घातपात असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले असून मोबाइल चोरल्याच्या संशयातून 11 जणांनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील चार संशयितांना पोलिसांनी अटक केली असून शनिवारी (दि. 20) न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना दोन दिवसांसाठी पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तेजस संभाजी तावडे (रा. नांद्रा, ता. पाचोरा) याने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्याचे वडील संभाजी भीमराव तावडे हे आपल्या साथीदारांसमवेत नांदुरी येथील सप्तशृंगीदेवीच्या चैत्रोत्सवासाठी पायी निघाले होते. दि. 2 एप्रिल रोजी ते बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव शिवारातील पाट कॅनॉल परिसरात पोहोचले. सायंकाळी 7.30 च्या सुमारास त्यांनी सोबत असलेल्या संशयित आरोपीकडून बोलण्यासाठी मोबाइल मागितला होता. त्यावरून त्यांचे फिर्यादी मुलाशी बोलणे झाले आणि त्यांनी तो लगेच संशयिताकडे परत केला होता. परंतु, मोबाइल परत केला नाही, असा आक्षेप घेत सातही जणांनी पाटील यांच्याशी वाद घातला होता. याचवेळी मागून आणखी चार जण आले आणि त्यांनीदेखील त्यांची बाजू घेत पाटील यांच्याशी वाद घातला होता. तसेच हिराई पेट्रोलपंपाजवळ सगळ्यांनी मिळून पाटील यांना चापटीने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर 11 जणांनी मिळून कटकारस्थान रचून पाटील यांना एका पडीक शेतात नेऊन डोक्यात अज्ञात हत्यार मारून त्यांना जिवे ठार मारले व पुरावा नष्ट करण्यासाठी हत्यार फेकून दिले. या फिर्यादीनुसार पोलिसांनी शरद विठ्ठल बोरसे (रा. टोळी, ता. पारोळा), नीलेश गंगाधर मराठे (23, रा. मुकटी, ता. धुळे), शिवाजी मुरलीधर पाटील (36, रा. मुकटी, ता. धुळे), अशोक ऊर्फ बापू धनराज मराठे (28, मुकटी, ता. धुळे), राजेंद्र शिवाजी चौधरी (33, मुकटी, ता.धुळे) आदींसह 11 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. यातील चार संशयितांना अटक करून शनिवारी (दि. 20) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांची दोन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली. उर्वरित संशयितांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे याबाबत बोलताना तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक किरण पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी रक्ताने माखलेली काळ्या रंगाची प्लास्टिकची ताडपत्री, मृताची चप्पल, घटनास्थळावरील माती आदी साहित्य जप्त केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘त्या’ भाविकाचा घातपातच; निव्वळ मोबाइलवरून केला खून appeared first on पुढारी.