नाशिक : ‘त्या’ मद्यधुंदचालकास न्यायालयीन कोठडी

मद्यधुंदचालकास न्यायालयीन कोठडी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मद्यसेवन करून वाहनांना व नागरिकांना कारखाली चिरडणार्‍या मद्यधुंद प्राध्यापकास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुरुवारी (दि.17) सायंकाळी उपनगर ते लेखानगर व तेथून चांडक सर्कल असा प्रवास करताना कारचालकाने अनेक वाहनांना व नागरिकांना धडक देत त्यांचा व स्वत:चा जीव धोक्यात घातला होता. पोलिसांनी चालकास ताब्यात घेतल्यानंतर तो नशेत आढळून आल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. साहेबराव दौलत निकम (50, रा. म्हसरूळ, पंचवटी) असे या चालकाचे नाव आहे.

साहेबराव निकम हे गुरुवारी सायंकाळी उपनगर येथून एमएच 15, जीएक्स 3096 क्रमांकाच्या कारमधून घरी निघाले. मात्र, नशेत असल्याने त्यांनी वाहनांना धडक देत भरधाव कार चालवली. त्यामुळे त्यांचा पोलिसांसह नागरिकांनी पाठलाग केला. मात्र, नशेत असल्याने त्यांनी कार न थांबवता अशोका मार्ग, लेखानगर, मायको सर्कल, चांडक सर्कल अशी कार चालवत अनेकांना धडक दिली. त्यात अविनाश प्रल्हाद साळुंके (49,रा. आनंदवली, गंगापूर रोड), प्रकाश मोरे (रा. सिडको) हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी निकम यास चांडक सर्कल येथे ताब्यात घेतले. दोन दिवस चालक नशेत असल्याने पोलिसांची चौकशी संथ गतीने होती. मात्र, निकम यांचे नातलग व मित्रपरिवाराने दिलेल्या माहितीनुसार ते कधीच मद्यसेवन करत नसल्याचे समोर आले. त्यामुळे गुरुवारी निकम यांना मद्य कोणी पाजले किंवा त्यांनी का पिले, हा प्रश्न उपस्थित झाला. पोलिस तपासात त्याचा उलगडा झाला असून, निकम यांना गुरुवारी कफ झाला होता. त्यामुळे ब्रँण्डी पिल्याने कफ घालवण्यास मदत होईल, या उद्देशाने त्यांनी मद्यसेवन केले. पहिल्यांदाच घेत असल्याने त्यांना त्याचा अंदाज आला नाही व पाणी कमी व मद्य जास्त झाल्याने त्यांना नशा आली. पोलिसांनी केलेल्या तपासात निकम यांनी उपनगर येथे कारमध्येच मद्यसेवन केले. त्यानंतर ते घरी निघाले. मात्र, रस्त्यात अज्ञात वाहनाला कट बसल्याने तो वाहनचालक पाठलाग करत असल्याने निकम यांनी त्यांची कार जोरात पळवली. त्यानंतर त्यांनी अनेकांना धडक देत स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घातला. नशेत असल्याने त्यांना काहीच आठवत नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. कारचे पुढील टायर फुटल्यानंतरही निकम यांनी कार चालवत गोल्फ क्लब मैदानाजवळ तिघांना धडक देत त्यांना जखमी केले होते. अखेर पोलिसांनी शासकीय वाहन आडवे लावून निकम यांची कार अडवली. या प्रकरणी निकम विरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात भरधाव कार चालवून स्वत:सह इतरांचा सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना शनिवारी (दि.19) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

.. तर अनर्थ टळला असता
निकम यांच्या कारची पुढील बाजू सर्वाधिक अपघातग्रस्त होती. निकम यांनी सुरुवातीलाच सीटबेल्ट लावला असता तर वाहनांना धडक दिल्यानंतरच सुरक्षेसाठी असलेल्या कारमधील एअर बॅग उघडल्या गेल्या असत्या. त्यामुळे त्यांना वाहन चालवणे अवघड झाले असते व पुढील अनर्थ टळला असता असा अंदाज वर्तवला जात आहे.

मद्याचे अज्ञानपण उठले जीवावर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकम यांनी या आधी कधी मद्यसेवन केल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे त्यांना मद्याचा व त्याचा असर कसा होतो याची माहिती नव्हती. इतर जण बिअर सरसकट पीत असल्याने त्यांनी मद्यही तसेच सेवन केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते मद्याच्या अमलात गेले व स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालून कार चालवल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘त्या’ मद्यधुंदचालकास न्यायालयीन कोठडी appeared first on पुढारी.