नाशिक : ‘त्या’ वैद्यकीय अधिकार्‍यांवर होणार कारवाई

१३ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गत महिन्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी जिल्ह्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मध्यरात्री अचानक भेट देण्याचा प्रसंग ताजा असतानाच, आता पुन्हा आरोग्य विभागाने जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांची स्थिती, सोयीसुविधा, कमतरता, औषधांची उपलब्धता, तालुकावासीयांचे आरोग्य यांची तपासणी करण्यासाठी एक दिवसीय पाहणी दौरा केला. यात सिन्नर तालुक्यातील ठाणगाव आणि नांदगाव तालुक्यातील बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्र या दोन ठिकाणी वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर लवकरच कारवाई होणार असल्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सांगितले.

तपासणीसाठी गेलेल्या अधिकारी वर्गाचा अहवाल डॉ. आहेर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. अहवालात नमूद केलेल्या गोष्टींमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रिपोर्टचे अपडेशन झालेले नाही, वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांची अनुपस्थिती या बाबी प्रकर्षाने नमूद करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यापासून आरोग्य विभागाच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. तुकाराम मुंढे हे कडक शिस्तीचे आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी राज्यातील प्रमुख आरोग्य अधिकार्‍यांची बैठक घेत काही विशेष सूचना केल्या होत्या. त्यामुळे आरोग्य विभागात सुस्तावलेल्या अधिकार्‍यांनी याचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसून येत आहे. पहिल्याच बैठकीत त्यांनी सर्व आरोग्य अधिकार्‍यांनी मुख्यालयी राहण्याचे फर्मान काढले होते आणि त्याबाबतचा अहवाल पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी या सरप्राइज व्हिजिट दिल्या होत्या. त्याचाच पुढचा भाग म्हणजे विभागातील अधिकार्‍यांना तपासणीसाठी पाठविणे होय. जिल्ह्यातील 15 जिल्हा पर्यवेक्षक, 8 जिल्हास्तरीय अधिकारी वर्गाने 15 तालुक्यांतील विविध आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपरुग्णालये येथे तपासणी करून जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे अहवाल सुपूर्द केला आहे. पाहणी दरम्यान, औषधांची उपलब्धता, कर्मचार्‍यांची दैनंदिनी, अ‍ॅडव्हान्स टूर प्लॅनप्रमाणे (एटीपी) कामे होत आहेत की नाहीत, याची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर क्षयरोग तपासणी, लसीकरण, असंसर्गजन्य आजार (हायपर टेन्शन, डायबिटीज, कॅन्सर) तसेच डेंग्यू, पिण्यास योग्य पाण्याची स्थिती, केंद्रातील स्वच्छता, लॅब टेस्ट, महिलांच्या प्रसूतीसाठी आवश्यक उपकरणांची उपलब्धता यांची तपासणी करण्यात आली. यावेळी अतिजोखमीच्या मातांची स्थिती, त्यांना देण्यात येणारे आर्थिक लाभ, देण्यात येणार्‍या सोयीसुविधा यांची पाहणी केली.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘त्या’ वैद्यकीय अधिकार्‍यांवर होणार कारवाई appeared first on पुढारी.