नाशिक : त्र्यंबकराजाच्या शिवलिंगावरील वज्रलेपाचे निघाले थर

trimbakraj www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकराजाच्या शिवलिंगावर 2006 मध्ये करण्यात आलेल्या वज्रलेपाचा थर थोडथोडा निघत असल्याचा प्रकार गुरुवारी (दि. 15) पूजेच्या वेळी लक्षात आला. त्यानंतर देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने याबाबत तातडीने पंचनामा केला. याबाबतचा अहवाल त्र्यंबकेश्वरचे पोलिस ठाणे आणि भारतीय पुरातत्त्व खात्याकडे पाठविण्यात आला आहे.

16 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या वज्रलेपाबद्दल येथील पुजाऱ्यांनी त्याच वेळी आक्षेप घेतला होता. हा वज्रलेप शास्त्रोक्त पद्धतीने झाला नसल्याचा आणि शिवलिंगाचा आकार बदलला असल्याचाही दावा करण्यात आला होता. आता या वज्रलेपाचा थर थोडाथोडा निघत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकराजाचे शिवलिंग हे दिवसेंदिवस होत असलेल्या पूजा, जलाभिषेक आदी उपचारांनी झिजले आहे. त्र्यंबकेश्वरच्या शिवलिंगाची रचना इतर स्थानांपेक्षा वेगळी आहे. येथे पिंडीवर शाळुंका नसून, शिवलिंगात बह्मा-विष्णू-महेश असे तीन उंचवटे आहेत. या उंचवट्यांवर असलेला कंगोरा, ज्याला पाळ असे म्हणतात, त्या पाळचा अंश निघाला आहे. शिवलिंगाची पूजा अलीकडच्या काही वर्षांत दूध, दही, मध, साखर अशा बाजारू पूजेच्या वस्तूंनी होत आहे. तशात जलाभिषेक करताना वापरलेले पाणी अशा काही घटकांनी 1990 च्या दशकात पिंडीची झिज होत असल्याचे निदर्शनास आले. भाविक शिवपिंडीवर दुधाची पिशवीच ओतायला लागले. याबाबत पुजाऱ्यांनी वेळोवेळी मागणी करीत दुधाचे अभिषेक थांबविले होते. पूजा साहित्य वाहण्यास मनाई केली होती. गर्भगृहात उतरलेल्या व्यक्तीने केवळ पाणी वाहण्याचा दंडक घालण्यात आला होता तसेच पिंडीवर जोरजोरात जल टाकणे अथवा उंचावरून पाण्याची धार धरण्याची पद्धत तातडीने थांबविण्याची गरज पुजारी आणि भाविकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : त्र्यंबकराजाच्या शिवलिंगावरील वज्रलेपाचे निघाले थर appeared first on पुढारी.