नाशिक : त्र्यंबकला 57 ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी

त्र्यंबकेश्वर ग्रामपंचायत निवडणुक www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 57 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी बुधवार (दि. 21)पासून सुरू झाली असून, पहिलाच दिवस पितृपक्षात असल्याने अर्ज दाखल करण्यापेक्षा विरोधक कोण आहेत, याची चाचपणी करण्यासाठी जास्त गर्दी झालेली दिसून आली. तहसील कार्यालयात नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांची जत्रा भरली होती.

सरपंच आणि सदस्य अशा 549 पैकी 275 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामध्ये 29 सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित आहेत. तालुक्यात एकूण 84 ग्रामपंचायती आहे. त्यातील 57 ग्रामपंचायतींची मुदत जून 2021 मध्ये संपली. मात्र, लांबलेली निवडणूक आता होत असल्याने ग्रामीण भागात उत्साह संचारला आहे. अगदी काल परवापर्यंत सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी विश्रांती घेतल्याने वातावरण बदलले आहे. मागचे दीड वर्ष प्रशासक असल्याने अनेक विकासकामांचा खोळंबा झाला, तर प्रशासक म्हणून नेमलेले पंचायत समितीच्या विविध विभागांतील विस्तार अधिकारीदेखील जबाबदारीला कंटाळलेले आहेत. आपल्या विभागाचे नियमित काम करताना प्रशासकाची अतिरिक्त जबाबदारी निभावताना त्यांची धावपळ होत आहे. हरसूल ठाणापाडा ते देवगाव भागात जवळपास 125 किलोमीटरचा प्रवास करत कामे मार्गी लावताना कसरत करावी लागत आहे. कधी पाणीटंचाईच्या कारणाने पूल तयार करावा, तर पावसाळ्यात तो पूर येऊन वाहून जातो, अशा विविध आपत्तींना तोंड देताना त्रेधातिरपीट झालेली पाहावयास मिळत आहे. उमेदवारी अर्ज खरेदी आणि सादर करणे सुरू होत आहे. त्यासाठी तहसील कार्यालयात बूथ तयार करण्यात आले आहेत. मतदानाची तारीख 13 ऑक्टोबर असून, लगेच दुसर्‍या दिवशी मतमोजणी आहे. दिवाळीपूर्वीच विजयाचे फटाके वाजतील आणि नंतर सोंगणी हंगामाला सुरुवात होईल, असे एकूण चित्र आहे.

जातपडताळणीसाठी शिफारस पत्र
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती पेसाअंतर्गत येत आहेत. तशात थेट सरपंच असल्याने इच्छुकांची संख्यादेखील मोठी आहे. सर्व ग्रामपंचायती आदिवासी जमातीसाठी राखीव आहेत. त्यासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. उमेदवारी अर्जासोबत जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्यास त्यासाठी केलेल्या आवेदन पत्राची पावती जोडणे अनिवार्य आहे. जातपडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी सबळ कारण आवश्यक असते. त्यासाठी निवडणूक लढवत आहे, असे शिफारसपत्र घेण्यासाठी त्र्यंबक तहसील कार्यालयात दररोज जत्रा भरत होती.

हेही वाचा:

The post नाशिक : त्र्यंबकला 57 ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी appeared first on पुढारी.