नाशिक : थकबाकीदार मालमत्तांची नव्या वर्षारंभी जप्ती मोहीम

नाशिक महापालिका लोगो www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मालमत्ता करासह पाणीपट्टी थकबाकीचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने कर वसुलीसाठी आता महापालिका येत्या सोमवार (दि. 2) पासून म्हणजे नव्या वर्षात थकबाकीदार असणार्‍या मालमत्तांची जप्ती मोहीम हाती घेणार आहे. त्याचबरोबर कर कक्षेत न आलेल्या आणि वापरात बदल करूनही त्याची माहिती मनपाला न देणार्‍या मालमत्तांचीही मनपा प्रशासनाकडून तपासणी केली जाणार आहे.

महापालिकेला सर्वाधिक महसूल जीएसटीच्या परताव्यातून मिळतो. त्याखालोखाल मालमत्ता कर (घरपट्टी) आणि पाणीपट्टी तसेच विकास शुल्काच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत उत्पन्न जमा होते. मात्र, कोरोना महामारीमुळे गेल्या दोन अडीच वर्षांपासून नागरिकांनी कर भरला नाही. त्यामुळे महापालिकेला कराचे उद्दिष्ट गाठता आले नाही. कोरोनाआधीही कर भरण्याकडे मालमत्ताधारकांनी पाठ फिरविल्याने महापालिकेची कर थकबाकीचा आकडा सुमारे 300 कोटींहून अधिक झाला आहे. तर पाणीपट्टीही दिलेल्या उद्दिष्टानुसार तसेच आधीची थकबाकी वसूल होत नसल्याने मनपाने थकबाकी वसुलीकरिता आता उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे तीन महिने राहिल्यान या कालावधीत अधिकाधिक थकबाकी वसुलीकरिता आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कर आकारणी विभागाला जप्ती मोहीम राबविण्याबरोबरच कर कक्षेत न येणार्‍या मालमत्ता शोधण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कर विभागातील कर्मचार्‍यांसह अधिकारी आणि विभागीय अधिकार्‍यांमार्फत मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जागेच्या वापरातील बदल झालेल्या परंतु, त्याची माहिती महापालिकेला न देणार्‍या मालमत्तांचाही शोध घेतला जाणार असून, अशा मालमत्ताधारकांवर दंडात्मक कारवाई आणि करवसुली करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिली. महापालिकेने साधारण आठ ते दहा वर्षांपूर्वी एका खासगी संस्थेच्या माध्यमातून मालमत्तांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणातून जवळपास 60 ते 65 हजार नवीन मालमत्ता मिळून आल्या होत्या. मात्र, या सर्वेक्षणाविषयीच अनेक तक्रारी आल्याने तसेच जवळपास 20 हजार मालमत्तांची नोंदणी होऊनही सर्वेक्षणात त्याची नोंद करण्यात आल्याने अशा मालमत्ता तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी वगळल्या होत्या. तर उर्वरित मालमत्तांबाबत सुनावणी घेण्यात येऊन त्यांना कर लागू करण्यात आला असून, काही मालमत्ता कर कक्षेत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संबंधित अधिकारी तसेच कर्मचार्‍यांमार्फत कर कक्षेत अद्याप न आलेल्या मालमत्ता शोधण्यात येणार असून, येत्या सोमवारपासून थकबाकीदार असलेल्या मालमत्ता जप्त करण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर पाणीपट्टी न भरणार्‍या मालमत्तांचे नळकनेक्शनदेखील तोडण्यात येणार आहे. – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त- मनपा.

हेही वाचा:

The post नाशिक : थकबाकीदार मालमत्तांची नव्या वर्षारंभी जप्ती मोहीम appeared first on पुढारी.