नाशिक : दहावा मैल चौफुली बनली खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा

Ozar www.pudhari.news

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा
सर्वाधिक वाहतुकीचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळख असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर ओझर शहरानजीकच असलेल्या दहावा मैल येथे महामार्गावरच रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच खड्ड्यांमुळे अपघातदेखील झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोणत्या मोठ्या अपघाताची वाट बघतेय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गांतर्गत पिंपळगाव-गोंदे हा सहापदरी रस्ता वाहतुकीच्या द़ृष्टिकोनातून सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असून, या महामार्गावर चोवीस तास वाहतूक असते. याच चौफुलीवरून विमानतळावर जाण्याचा मार्ग असल्याने अनेक केंद्रीय मंत्री, राज्यातले मंत्री नाशिकला येताना याच मार्गावरून येतात. गेल्या अनेक महिन्यांपासून या चौफुलीवरील रस्त्यात मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. पिंपळगाव टोल नाक्याकडे जाताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना खड्डे दिसत नसावे, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. हा महामार्ग पिंपळगाव टोल नाक्याच्या अंतर्गत येत असल्याने वाहनचालकांकडुन वारेमाप टोल घेणार्‍या पिंपळगाव टोल नाक्याची ही जबाबदारी असूनही संबंधित यंत्रणेकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तात्पुरती सतर्कता म्हणून या ठिकाणी आता पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. परंतु हे खड्डे बुजवणार कधी हा प्रश्न आहे?

गडकरींच्या घोषणेचे काय?
केंद्रीय रस्ते महामार्ग तथा परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी मध्यंतरी राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे फक्त तीन तासांत बुजवले जातील, अशी घोषणा केली होती. ओझर महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डे असताना, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ते निदर्शनास आले नाही, हेदेखील आश्चर्यच.

तांत्रिक अडचण..?
महामार्गावरील पथदीप बहुतांश वेळा बंदच असल्याने या ठिकाणी कायमच अंधाराचे साम्राज्य असते. या पथदीपांचे वीजबिल हे पिंपळगाव टोल नाका व्यवस्थापन भरत असल्याने हे पथदीप वीजबचत ही तांत्रिक अडचणींमुळे बंद असतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : दहावा मैल चौफुली बनली खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा appeared first on पुढारी.