Site icon

नाशिक : दाढीवाल्या बाबाला धडा शिकवा – खासदार विनायक राऊत

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
माझ्या समक्ष अन्नावर हात ठेवून ‘उद्धव साहेबांशी बेईमानी करणार नाही, गद्दारी केलीच तर देहात प्राण ठेवणार नाही’, अशी शपथ घेणारे पांढरी दाढीवाले बाबा दुसर्‍याच दिवशी अलीबाबाच्या 40 गद्दारांच्या टोळीत दाखल झालेत. त्यांना धडा शिकवण्यासाठी सच्च्या शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी केले आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 26 मार्च रोजी मालेगावी होणार्‍या शिवगर्जना महामेळाव्याच्या तयारीच्या आढावा बैठकीप्रसंगी ते आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करत होते. प्रारंभी सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी उपनेते डॉ. अद्वय हिरे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सुधाकर बडगुजर, गणेश धात्रक, महिला आघाडीप्रमुख शुभांगी पाटील, माजी आमदार संजय पवार, लकी खैरनार, पवन ठाकरे आदी उपस्थित होते. ‘सुखात सोबती-दुःखात पळती’ त्यांना पळताभुई कमी पडेल, आपले उपनेते डॉ. हिरे हे झुंझार व आश्वासक नेते आहेत. ते स्वतःसह उत्तर महाराष्ट्रात त्यांच्या सोबतीचे शिवसेनेचे आमदार निश्चितच निवडून आणतील, असा विश्वास व्यक्त करत खासदार राऊत यांनी, आता आमची आउटगोइंग बंद झालीय. कोणीच आता सोडून जाणार नाहीत, गद्दारांना अडीच वर्षांनंतर हिंदुहृदयसम्राटांची आठवण आली आहे, दाढीवाल्या बाबाला मंत्रिपद मिळावे, म्हणून मी जास्त आग्रही होता, मात्र, त्यांनी भ्रमनिरास केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. उपनेते डॉ. अद्वय हिरे यांनी मेळाव्याच्या तयारीची रूपरेषा स्पष्ट करून शिवसैनिकांनी आपल्या शहराची प्रतिमा जपून ती आणखीन उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी प्रास्ताविकात मार्गदर्शन केले. प्रमोद शुक्ला यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा:

The post नाशिक : दाढीवाल्या बाबाला धडा शिकवा - खासदार विनायक राऊत appeared first on पुढारी.

Exit mobile version