नाशिक : दादा भुसेंच्या मतदारसंघात उद्या आदित्य ठाकरेंचा दौरा

आदित्य ठाकरे, दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारसेवा
प्रकृतीच्या कारणामुळे स्थगित केलेला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा पुन्हा एकदा सुरू झाला आहे. दुसर्‍या टप्प्यात ठाकरे हे गौण खनिजमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात शनिवारी (दि.20) शिवसैनिकांसह नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेला सावरण्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद दौरा महाराष्ट्रभर सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी नाशिक शहरात मेळावा घेतला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मनमाड, येवलामार्गे औरंगाबादमध्ये मेळावा घेत, शिंदे गटावर निशाणा साधला होता. 9 ऑगस्टच्या सुमारास ते दुसर्‍या टप्प्यातील दौर्‍यासाठी सिन्नरमार्गे मालेगावला जाणार होते. मात्र, त्याचवेळी आदित्य ठाकरे यांची प्रकृती बिघडल्यामुळे दौरा स्थगित झाला होता. आता हा दौरा 20 ऑगस्ट रोजी होणार असून, शनिवारी पाचोरा येथे दुपारी 12 वाजता मेळावा होईल. त्यानंतर ते धरणगाव, पारोळा येथील कार्यक्रम आटोपून धुळेमार्गे सायंकाळी पाच वाजता मालेगावमध्ये येतील. याठिकाणी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांशी चर्चा करून सायंकाळी 6.30 वाजता कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी हे ठाकरेंच्या दौर्‍याचे नियोजन करत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : दादा भुसेंच्या मतदारसंघात उद्या आदित्य ठाकरेंचा दौरा appeared first on पुढारी.