नाशिक : दादा म्हणतात, हम साथ साथ हैं! आमदार, खासदारांपुढे पालकमंत्र्यांचे नमते?

सुहास कांदे, हेमंत गोडसे, दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अगोदर आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याविषयी उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी पालकमंत्र्यांविनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक उरकल्याने जिल्ह्यात शिंदे गटात आलबेल नसल्याचे दिसून आले. श्रेयवादावरून रंगलेल्या या नाट्याचे परिणाम आगामी निवडणुकांवर तर होणार नाही ना, अशी शक्यता वर्तविली जात असतानाच पालकमंत्री दादा भुसे यांनी, आमच्यात कुठलेच मतभेद नसल्याचे सांगत या प्रकरणी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी, ‘कालही आम्ही सोबत होतो अन् उद्याही राहू’ असे म्हणत ‘हम साथ-साथ हैं’चा दावा केला खरा, पण त्यांनी आमदार अन् खासदारांपुढे नमते तर घेतले नाही ना? अशी चर्चा यानिमित्ताने रंगली आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ना. भुसे यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली.

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे पालकमंत्री, आमदार अन् खासदारांमधील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वादावर कसा पडदा टाकणार याबाबतची उत्सुकता लागली होती. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री भुसे यांच्याबाबत उघड नाराजी बोलून दाखविताना आपल्याला बैठकांना तसेच पदाधिकाऱ्यांची नेमणूक करताना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांनी संघर्षाची भूमिकाही बोलून दाखविली होती. त्यांच्या आरोपावर मात्र, पालकमंत्री भुसे यांनी त्यावेळी चुप्पी साधली होती. ‘मुख्यमंत्री यात लक्ष घालतील’ असे म्हणत त्यांनी यावर बोलणे टाळले होते. त्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याविनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाशिकप्रश्नी बैठक घेतली होती. त्यामुळे आमदार, खासदार अन् पालकमंत्र्यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून आले होते.

दरम्यान, गुरुवारी (दि. २४) नाशिकमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री भुसे यांना याविषयी विचारले असता, आमच्यात कुठलेही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ‘हम साथ-साथ हैं’चा दावाही केला. मात्र, आगामी निवडणुका विचारात घेऊन पालकमंत्र्यांनी दोन पावले टाकत नरमाईची भूमिका तर घेतली नाही ना? अशी चर्चा आता रंगली आहे.

एकत्र बसून मार्ग काढू

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नी पालकमंत्री दादा भुसे यांना विचारले असता, ‘महाराष्ट्रातील ४० गावांवर कर्नाटकाने केलेला दावा महाराष्ट्राचे नागरिक मुळीच सहन करणार नाहीत. खूप कष्टाने आपण महाराष्ट्र मिळवला आहे. १०५ हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले आहे. काही अडचणी असतील, तर त्यावर एकत्र बसून मार्ग काढू, असे भुसे यांनी सांगितले.

प्रभाग रचनेत थोडेफार बदल

गेल्या १० महिन्यांपासून लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास मंत्रालयाने आयुक्तांना दिले आहेत. प्रभाग रचनेबद्दल बोलताना, पूर्वीप्रमाणेच प्रभाग रचना होणार असून यात थोडेफार बदल होणे अपेक्षित आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे. मात्र निवडणुका कधी होईल हे सांगता येत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : दादा म्हणतात, हम साथ साथ हैं! आमदार, खासदारांपुढे पालकमंत्र्यांचे नमते? appeared first on पुढारी.