नाशिक : दारणा, पालखेडसह जिल्ह्यातील प्रमुख धरणांची दारे बंद

दारणा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या आठवड्याभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने दारणा, पालखेडसह जिल्ह्यातील प्रमुख धरणांची दारे बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, चोवीस प्रमुख प्रकल्प काठोकाठ भरली असून, आजमितीस त्यात 65 हजार 388 दलघफू उपयुक्त पाणीसाठा आहे.

राज्याच्या काही भागांत परतीच्या पावसाने थैमान घातलेले असताना त्याचा जोर ओसरला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा लाभला आहे. पावसाने उघडीप दिल्याने दारणा, पालखेड, भावली, मुकणेसह इतर प्रमुख धरणांमधील विसर्ग बंद करण्यात आला आहे. आळंदीमधून 30, भोजापूरमधून 190 आणि वालदेवीतून 65 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. तर नांदूरमध्यमेश्वरचा विसर्ग 2 हजार 421 क्यूसेकपर्यंत घटविण्यात आला. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यातच चालू महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसाने धरणांमधील आवक कायम होती. त्यामुळे गंगापूर, दारणा, पालखेड, मुकणे, चणकापूर, गिरणा आदी प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र, आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने विसर्गात टप्प्याटप्प्याने घट केली. मागील 24 तासांपासून हा विसर्गही बंद करण्यात आलेला आहे.

जायकवाडीत 117 टीएमसी पाणी…
जिल्ह्यात चालू वर्षी पावसाने सातत्य राखले. त्यामुळे गंगापूर, दारणासह अन्य धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला. हेच पाणी नांदूरमध्यमेश्वरमार्गे जायकवाडीत पोहोचले. जायकवाडीची क्षमता 102 टीएमसी असून, नाशिकमधून विक्रमी 117.7 टीएमसी पाणी वाहून गेले. या पाण्यावर नांदेडपर्यंतची धरणे भरल्याने पुढील पावसाळ्यापर्यंत मराठवाड्याची तहान भागणार आहे.

धरणसाठा (दलघफू) : गंगापूर 5614, दारणा 7149, काश्यपी 1852, गौतमी-गोदावरी 1818, आळंदी 816, पालखेड 638, करंजवण 5356, वाघाड 2302, ओझरखेड 2130, पुणेगाव 620, तिसगाव 455, भावली 1434, मुकणे 7097, वालदेवी 1133, कडवा 1688, नांदूरमध्यमेश्वर 234, भोजापूर 361, चणकापूर 2416, हरणबारी 1166, केळझर 572, नागासाक्या 397, गिरणा 18500, पुनद 1306, माणिकपुंज 334.

हेही वाचा:

The post नाशिक : दारणा, पालखेडसह जिल्ह्यातील प्रमुख धरणांची दारे बंद appeared first on पुढारी.