नाशिक : दिंडोरीला आले माथेरानचे स्वरूप; दाट धुक्यामुळे मात्र द्राक्षपंढरी धोक्यात तर बळीराजा चिंतेत

दिंडोरी www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : समाधान पाटील

तालुक्यात सध्या पहाटे पासूनच पाणी मिश्रित दाट धुके पडत असल्याने द्राक्षपंढरीला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या तालुक्यातील बळीराजांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर तालुक्यातील शेतीवर अस्मानी संकटाचे ढग निर्माण झाले आहे. तर सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याने दिंडोरीला जणू माथेरानचे स्वरुपच प्राप्त झाल्याने नागरिक या थंडीचाही आनंदाने स्वागत करत आहेत. पहाटे मॉर्निंग वॉकला प्राधान्य दिले जात आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून तालुक्यात पाणी मिश्रित दाट धुके पडत असल्याने रब्बी हंगामातील बहुतेक पिकांना धोका निर्माण झाला आहे. सध्य स्थितीत थंडीच्या शीतलहरी वाढल्याने कधी जास्त तर कधी कमी प्रमाणांचे पा-याचे समीकरण दिसून येत आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाहिजे ते पोषक वातावरण मिळत नसल्याने रब्बी हंगामातील उत्पादन क्षमतेवर त्यांचा विपरीत परिणाम होण्याचा मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. तीन चार दिवसांपासून पाणी मिश्रित दाट धुके व कमी प्रमाणातील थंडी यामुळे रब्बी हंगामातील पिके व द्राक्षे पिके वाचवण्यासाठी बळीराजांला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सन २०१४-१५ मधील रब्बी हंगामात अशाच स्वरुपाचे वातावरण तयार झाले होते. गहू, हरभरा, द्राक्षे इ. पिकांना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला होता. त्यामुळे उत्पन्न वाढीवर त्यांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला होता. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला होता. दिवसेंदिवस वातावरणातील होणारा बदल हा शेतकरी वर्गाच्या प्रगतीला खिळ घालणारा ठरत असल्याने तालुक्यातील शेती व्यवसाय धोक्याची घंटा वाजवित असल्याने शेती व्यवसाय शेतकरी वर्गाला एक प्रकारे आवाहन ठरत आहे. वातावरणातील बदल अशाच कायम राहिला तर शेतकरी वर्ग कर्जाच्या डोंगराखाली गाडला जाईल असा विचार सध्या जाणकार शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीला पोषक वातावरण होते. परंतु पेरण्या संपल्यानंतर व उगवण प्रक्रिया मध्यावर आल्यानंतर रब्बी हंगामातील पिकांवर वातावरणातील बदलाचे गडद अस्मानी संकट निर्माण झाल्याने मेटाकुटीला आलेला जगाचा पोशिंदा बळीराजा आता यामुळे चारी मुंड्या चित होतो की काय ? अशी भीती दिंडोरी तालुक्यातील बळीराजांला वाटु लागली आहे. यंदा रब्बी हंगामाला पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु वातावरण साथ देत नसल्याने रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगाचे आक्रमण होउ पाहात असल्याने पिके वाचवण्यासाठी शेतकरी वर्ग तारेवरची मोठी कसरत करीत आहे.

हिवाळ्यात चक्क रेनकोटचा वापर :-
सध्या पाणी मिश्रित दाट धुके पहाटेपासून मोठ्या प्रमाणावर पडत असल्याने सकाळी प्रवासी करणारे विविध कंपन्यातील कामगार, मजुर वर्ग यांना सकाळी प्रवास करतांना चक्क रेनकोटचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे सध्या हिवाळा आहे पावसाळा ही एक डोके दु:खीचे गणित होऊन बसले आहेत.

सध्या द्राक्षे पंढरीत द्राक्षांच्या घडांना पेपर आच्छादनाचे काम तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. त्यासाठी प्रचंड महागाचे पेपरमध्ये खरेदी केले जात आहे. परंतु सध्या पाणी मिश्रित दाट धुके पडत असल्याने घडांना आच्छादन केलेले पेपर संपूर्ण पणे ओले होत असल्याने पेपर खराब होत असुन त्यांचा परिणाम घडांवर होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा वातावरणातील सतत होणार बदल शेतकरी वर्गाला आर्थिक संकटात नेणारा आहे. – छबुतात्या मटाले, द्राक्षे उत्पादक शेतकरी, पालखेड बंधारा, ता.दिंडोरी.

हेही वाचा:

The post नाशिक : दिंडोरीला आले माथेरानचे स्वरूप; दाट धुक्यामुळे मात्र द्राक्षपंढरी धोक्यात तर बळीराजा चिंतेत appeared first on पुढारी.