नाशिक : दिंडोरी तालुक्यातील ढकांबे दरोड्याच्या गुन्ह्याची पोलिसांकडून उकल

दिंडोरी www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी / ढकांबे) : पुढारी वृत्तसेवा

येथील दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलीसांना यश आले असून आंतरराज्यीय टोळीतील चार दरोडेखोरांना पोलिसांनी  गजाआड केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत दि. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी ढकांबे मानोरी शिवारातील शेतकरी रतन शिवाजी बोडके यांच्या मालकीच्या शिवकमल बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात ६ जणांनी प्रवेश केला. त्यानंतर बंदूक व चाकूचा धाक दाखवत सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम ८ लाख ५० हजार रुपये असा एकूण १७ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरला. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग कविता फडतरे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर तीन वेगवेगळी पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकांना सूचना दिल्या. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या पथकांनी वरील गुन्हयातील प्रत्यक्षदर्शीने बघितलेल्या संशयितांच्या वर्णनावरून तसेच इतर पुराव्यांवरून शहरातील संशयीत नौशाद आलम फजल शेख (२५, रा. पंचशीलनगर झोपडपट्टी, नाशिक-पुणे रोड, नाशिक) यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता नाशिक व मध्यप्रदेश राज्यातील साथीदारासह त्याच्याकडील सफेद रंगाची स्विफ्ट डिझायर चारचाकी व दुचाकीवर दिंडोरी रोडने ढकांबे-मानोरी परिसरात जाऊन एका अलिशान बंगल्यात दरोडा टाकला. यामध्ये सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरल्याचे त्याने कबूल केले आहे.

या गुन्ह्यामध्ये शेख याने त्याचे साथीदार रेहमान फजल शेख (रा. राहुलनगर, जेलरोड, नाशिक), इरशाद नईम शेख (रा. संजेरी रो-हाऊस, राजराजेश्वरी मंगल कार्यालय शेजारी, जेलरोड, नाशिक), लखन बाबूलाल कुंडलिया, रवि उर्फ लालू देवीलाल फुलेरी, इकबाल खान फान खान (सर्व रा. रसुलपूर, देवास, जि. देवास, राज्य मध्यप्रदेश), भुरा उर्फ पवन रतन फुलेरी (रा. इंदौर, राज्य मध्यप्रदेश), रिझवान शेख यांच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. यामध्ये तिघांना पुणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेवून त्यांच्याकडून १६ तोळे वजनाचे ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. गुन्ह्यातील आणखी चार दरोडेखोर फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. संशयितांविरोधात धुळे, औरंगाबाद, पुणे, नाशिक आणि मध्यप्रदेशमध्ये दरोडा, जबरी चोरी व चोरी यासारखे मालाविरुध्दचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तर दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे पुढील तपास करत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोउनि अमोल पवार, पोउनि नामा शिरोळे, सपोउनि रविंद्र वानखेडे, पोहया नवनाथ सानप, जालिंदर खराटे, पोना विश्वनाथ काकड, सुशांत मरकड, बाळासाहेब पानसरे, धनंजय शिलावटे, हेमंत गिलबिले, किशोर सानप, मंगेश गोसावी, यांच्या पथकाने केली.

हेही वाचा:

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यातील ढकांबे दरोड्याच्या गुन्ह्याची पोलिसांकडून उकल appeared first on पुढारी.