नाशिक : दिंडोरी तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायतीची १८ सप्टेंबरला निवडणूक

Gram Panchayat Election 2022

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मुदत संपलेल्या पन्नास ग्रामपंचायतीसाठी (Gram Panchayat Election 2022) येत्या 18 सप्टेंबरला मतदान होणार आहे. आचार संहिता शुक्रवार (दि. १२ ऑगस्ट) पासून लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीअंतर्गत २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहेत. त्यानंतर दोन सप्टेंबर रोजी अर्जाची छाननी व ६ सप्टेंबर पर्यंत अर्ज मागे घेतले जाणार आहेत. तसेच १८ सप्टेंबर रोजी मतदान आणि १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

राज्याचे निवडणूक आयुक्त मदान यांनी शुक्रवारी निवडणूक जाहीर (Gram Panchayat Election 2022) केलेल्या राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींपैकी दिंडोरी तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला होता. घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट रोजी निवडणुकीची नोटीस जाहीर करतील. त्यानुसार नामनिर्देशन पत्र २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर रोजी स्वीकारण्यात येणार असून दोन सप्टेंबर रोजी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ६ सप्टेंबर असूनण मतदान १८ सप्टेंबर रोजी होणार असून, मतमोजणी १९ सप्टेंबर रोजी होणार आहे.

निवडणूक आयोगाने (Gram Panchayat Election 2022) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ज्या तालुक्यात कमी पाऊस होतो त्यामध्ये निवडणुका जाहीर केल्या आहेत. निवडणूक कार्यक्रमाच्या कुठल्याही टप्प्यात अतिवृष्टी किंवा पूर परिस्थिती उद्भवल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी निवडणूक आयोगास देणार आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून लांबलेला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मोर्चेबांधणीस वेग आला आहे. त्यातच शासनाने जाहीर केल्याप्रमाणे सदस्य पदा बरोबरच ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवडणूक थेट पद्धतीने होणार असल्याने ग्रामीण भागातील मतदारांमध्ये याबाबत उत्सुकता दिसून येत आहे.

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायतीची १८ सप्टेंबरला निवडणूक appeared first on पुढारी.