Site icon

नाशिक : दिक्षी गावात अवैध दारूविरोधात महिला आक्रमक; तळीरामांची पळापळ

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा
अवैध दारूविक्रीबाबत निवेदन दिल्यानंतर पोलीसी खाक्या दाखवत अवैध दारू दुकानांवर कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर चार दिवसाने पुन्हा हॉटेल व्यावसायिकाडून अवैध दारु विक्री होत असल्याने दिक्षी गावातील महिलांनी थेट हॉटेलवरच मोर्चा वळवल्याने तळीरामांची चांगलीच पळापळ झाली.
ओझर पोलीसठाणे पासून अवघ्या ४ किलोमीटर असलेल्या दिक्षी गावातील आदिवासी समाजाच्या महिलांनी पंधरवड्यापूर्वी दिक्षी  येथे सुरू असलेले अवैध दारू विक्री बंद करण्याच्या आशयाचे निवेदन दिक्षी ग्रामपंचायत व ओझर पोलिसात दिले. त्यानंतर पोलिसांनी  संबंधीत दारू विक्री करणाऱ्या दुकानावर छापे टाकत कारवाई सुद्धा केली. परंतु, नव्याचे नवे दिवस याप्रमाणे कारवाईच्या चार दिवसानंतर पुन्हा अवैध दारू विक्री सुरू झाल्याने कायद्याचा धाकच उरला नसल्याने काेणत्याही कारवाईस न जुमानता गावाजवळच असलेल्या सरकारवाडा या हॉटेलमध्ये थेट अवैध दारू विक्री केली जात होती. ग्रामस्थांनी संबंधित हॉटेल चालकाला दारू विक्री बंद करण्याची विनंती केली. मात्र, ग्रामस्थांची विनंती व पोलिसांना न जुमानता संबंधित व्यावसायिकाने दारू विक्री सुरूच ठेवल्याने अखेर महिलांनी सोमवारी, दि.19 रात्री 8 च्या सुमारास सरकारवाडा हॉटेलवर धडक मोर्चा काढला. सरकारवाडा हॉटेलमध्ये विक्री होत असलेल्या दारुच्या वाटल्या फोडल्या व पुन्हा दारू विक्री केल्यास कायदा हातात घेऊ असा सज्जड दमच हॉटेल व्यावसायिकांना दिला. महिलांचा रुद्र अवतार पहाता तळीरामची चांगलीच पळापळ यावेळी पाहायला मिळाली. दिक्षी गावातील सुनीता गायकवाड, सीताबाई चव्हाण, निर्मला  गोधडे, सुनीता मोरे, सुमनबाई गांगुर्डे, माहल्याबाई गांगुर्डे, लंकाबाई आंबेकर ,सरला आंबेकर आदींसह ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ गांगुर्डे, चेतन चौधरी ,तंटामुक्ती उपाध्याक्ष राजेश धुळे यांच्यासह महिलांनी अवैध मद्याविरोधात माेर्चा वळवला होता.
अवैध व्यवसायास कोणाचा वरदहस्त
दिक्षी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्रीचा सर्रास धंदा सुरू आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने एका अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर छापा घालत कारवाई केली होती. अवैध धंद्याच्या बातम्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना मिळतात. परंतुु,  ओझर पोलीसांना त्याचा सुगावा देखील लागत नाही. यावरूनच अवैध धंद्यांना कोणाचा वरदहस्त आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : दिक्षी गावात अवैध दारूविरोधात महिला आक्रमक; तळीरामांची पळापळ appeared first on पुढारी.

Exit mobile version