नाशिक : दिनकर पाटील यांच्या नावे खासदार गोडसेंना उद्देशून आक्षेपार्ह पोस्ट

दिनकर पाटील, हेमंत गोडसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

‘रोज थापा, रोज घोषणा, कान आमचे विटले आहेत, गद्दार ते गद्दारच शेवटी, आता सार्‍यांना पटले आहे’ अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप-शिवसेना (शिंदे) मधील स्थानिक वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या नावे खासदार हेमंत गोडसे यांना उद्देशून ही पोस्ट असून, सध्या ती चांगलीच व्हायरल होत आहे. दरम्यान, या पोस्टवरून राजकारण पेटत असतानाच पाटील यांनी ही पोस्ट आपण शेअर केली नसल्याचे स्पष्ट केले. तर खा. गोडसे यांनी, ‘इच्छुकांना शुभेच्छा’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीत सेना-भाजप युतीवर एकमत झाले असले तरी, नाशिक लोकसभेच्या जागेवरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू असून, ठाकरे गटाच्या नेत्यांकडून शिंदे गटाच्या आमदार-खासदारांचा सातत्याने ‘गद्दार’ असा उल्लेख केला जात आहे. या सर्व आरोप-प्रत्यारोपात मात्र, भाजप शिंदे गटाच्या खंबीरपणे पाठीशी असल्याचे नेहमीच दिसून आले आहे. मात्र, भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या नावे व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये खा. गोडसे यांना उद्देशून गद्दार असा शब्दप्रयोग झाल्याने, स्थानिक स्तरावर भाजप-शिंदे गटात दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे. पाटील भाजपकडून आगामी लोकसभेसाठी इच्छुक तर गोडसे विद्यमान खासदार आहेत. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला असला तरी, जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले नसल्याने दोन्ही गटांत नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. याच स्पर्धेतून हा वाद समोर आल्याची चर्चा आता रंगत आहे.

सोशल मीडियावरील पोस्ट अशी

‘रोज थापा, रोज घोषणा, कान आमचे विटले आहेत. गद्दार ते गद्दारच शेवटी, आता सार्‍यांना पटले आहे. हालअपेष्टा सहन करत, नागरिक सारे वैतागले आहेत. काम नाही नुसत्या गप्पा, भ्रष्टाचारात दंग आप्पा, गाव सारं पाहतं आहे. कारभारी बदलण्यासाठी, रान सारं पेटलं आहे. धडाडी आणि सचोटीचे अण्णा, पुढारी नाही, आधार उद्याचा, खासदार आता नाशिकचा, सार्‍यांचं ठरलं आहे’

‘दिनकर अण्णा पाटील फॅन क्लब’ या फेसबुक पेजवरून ही पोस्ट व्हायरल झाली असून, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. त्यामुळे यावर मी काही बोलू शकत नाही.

– दिनकर पाटील, माजी नगरसेवक, भाजप

 

प्रत्येकालाच निवडणूक लढण्याची इच्छा असते. सर्व इच्छुकांना माझ्या शुभेच्छा. जागावाटपाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होतो. अजून निवडणुकांना बराच अवधी आहे. पुलाखालून बरेच पाणी जायचे आहे. आताच बोलणे उचित नाही.

– हेमंत गोडसे, खासदार, शिवसेना

 

भुजबळांकडून टीका

विरोधकांनी असे म्हटले तर ठीक आहे, परंतु भाजपच्याच माजी नगरसेवकांनी असे म्हणणे चुकीचे आहे. खासदारांना असे म्हणणे म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यासारखे असल्याची टीका माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

हेही वाचा :

The post नाशिक : दिनकर पाटील यांच्या नावे खासदार गोडसेंना उद्देशून आक्षेपार्ह पोस्ट appeared first on पुढारी.