नाशिक : दुपारी बोलणी झाली, भाव ठरला; रात्री क्षणात होत्याचं नव्हतं झालं!

अवकाळी,www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील जोपूळ येथील शेतकरी एकनाथ संपत उगले यांच्या पाच एकर बागेवरील द्राक्षांची 37 रुपये किलो दराने दुपारी बाेलणी झाली होती. त्या पॅकिंगची तयारीही रशियातील व्यापाऱ्यांनी केली होती मात्र, अचानक सायंकाळच्या सुमारास झालेल्या गारपिटीने संपूर्ण बागच होत्याची नव्हती झाली. हीच परिस्थिती तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या वाट्याला आली आहे.

शनिवारी वादळीवाऱ्यासह झालेल्या गारपिटीने परिसरातील द्राक्षशेती अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहे. गत 15 दिवसांत आधीच द्राक्षाचे भाव घसरले होते. मात्र तरीही अत्यंत चांगली प्रत असलेली उगले यांची द्राक्ष रशियातील निर्यातदारांस पसंत पडली. शनिवारी दुपारी निर्यातदार बागेत आले अन‌् व्यवहारही ठरला होता. रविवारी द्राक्ष तोडणीसाठी पॅकिंग करण्याचेही व्यापाऱ्यांनी कबूल केले. मात्र गारपिटीने क्षणात निर्यातक्षम द्राक्षे अशरश झोडपून काढली. या गारपिटीत जमिनीवर मण्यांचा सडा पडला होता. यात उगले यांचे सुमारे एक हजार क्विंटल द्राक्ष जमीनदोस्त झाली. या प्रकाराने शेतकरी कुटुंब हतबल झाले आहे. हीच परिस्थिती जोपूळ, लोखंडेवाडी चिंचखेड, कुर्णोली, मोहाडी, परमोरी, जऊळके येथील अनेक शेतकऱ्यांची झाली आहे.

The post नाशिक : दुपारी बोलणी झाली, भाव ठरला; रात्री क्षणात होत्याचं नव्हतं झालं! appeared first on पुढारी.