नाशिक : दुप्पट पेन्शनचा जिल्ह्यातील आठ स्वातंत्र्यसैनिकांना मिळणार लाभ

जुन्या पेन्शन योजना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य शासनाने स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तिवेतनात दुपटीने वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्वातंत्र्यसैनिकांना दरमहा 20 हजार रुपये निवृत्तिवेतन मिळणार आहे. जिल्ह्यातील आठ स्वातंत्र्यसैनिकांना त्याचा लाभ होणार आहे.

जीवाची पर्वा न करता भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्तिसंग्राम तसेच गोवा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांना राज्य शासनाकडून दरमहा 10 हजार रुपये निवृत्तिवेतन देण्यात येत. 1965 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या स्वातंत्र्यसैनिकांप्रति कृतज्ञतेची भावना म्हणून शासनाने निवृत्तिवेतनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय गुरुवारच्या (दि.17) मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. त्यामुळे राज्यातील 6 हजार 229 स्वातंत्र्यसैनिकांना दुप्पट निवृत्तिवेतानाचा लाभ मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 8 स्वातंत्र्यसैनिकांचा यात समावेश आहे. आठपैकी दोघा स्वातंत्र्यसैनिकांनी 1942 च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला. तर उर्वरित सहा जण हे गोवामुक्ती लढ्यात सहभागी झाले होते. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना दुप्पट म्हणजेच 20 हजार रुपये निवृत्तिवेतन मिळणार आहे.

जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक
पांडुरंग सांगळे (गोवामुक्ती लढा), भिवसेन पगारे (गोवामुक्ती लढा), मनोहर कुलकर्णी (1942 चा स्वातंत्र्य लढा), माधव वाघ (गोवामुक्ती लढा), रमाकांत मराळकर (गोवामुक्ती लढा), रसिकलाल शाह (गोवामुक्ती लढा), लक्ष्मण ढोके (1942 चा स्वातंत्र्य लढा), कुसुमताई गायकवाड (गोवामुक्ती लढा).

The post नाशिक : दुप्पट पेन्शनचा जिल्ह्यातील आठ स्वातंत्र्यसैनिकांना मिळणार लाभ appeared first on पुढारी.