नाशिक : दूध आंदोलनातील सातही आंदोलकांची निर्दोष मुक्तता

दूध संघ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

चार वर्षांपूर्वी दूध दरवाढीबाबत कसारा घाटात झालेल्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कसारा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांतून संघटनेचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्यासह सात जणांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली.

चार वर्षांपूर्वी दि. १६ जुलै २०१८ ला दूध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलनाचा भडका उडाला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मुंबईला जाणारा दूधपुरवठा खंडित करण्यात आला होता. कसारा घाटात शेतकरी आंदोलक आणि दूध वाहक टँकरच्या बंदोबस्तास असणाऱ्या पोलिस पथकामध्ये संघर्ष झाला होता. हंसराज वडघुले, दीपक पगार, नितीन रोठे पाटील, सोमनाथ बोराडे, नाना बच्छाव, संजय जाधव, युवराज देवरे या सात आंदोलकांवर कसारा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. टँकरची हवा सोडणे, तोडफोड करणे, संरक्षण देणाऱ्या पोलिस पथकाला धक्काबुक्की करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आले होते. तसेच आंदोलकांना सुमारे महिनाभर तळोजा (मुंबई) कारागृहात ठेवण्यात आले होते. तेव्हापासून कल्याण सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता. आंदोलनात सर्व महत्त्वपूर्ण पदाधिकारी असल्याने आंदोलन चिघळू नये म्हणून सरकारच्या सूचनेनुसार या आंदोलकांना ताब्यात घेऊन खोटे गुन्हे दाखल केले होते. आंदोलन दडपण्यासाठी तत्कालीन युती सरकारच्या पोलिस प्रशासनाला तशा सूचना होत्या, असा युक्तिवाद आंदोलकांच्या वकिलांनी न्यायालयात केला. न्यायालयाने युक्तिवाद मान्य करून सातही आंदोलकांची निर्दोष मुक्तता केली.

आंदोलकांच्या बाजुने ॲड. जगदीश वरघडे, ॲड. प्रसन्ना बारसिंग यांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती पी. आर. आस्तुरकर यांनी आंदोलकांची निर्दोष मुक्तता केली. तुरुंगवासाच्या काळात शहापूर येथील विनायक पवार, बबन हरणे, चंद्रकांत भोईर यांनी आंदोलकांना सहकार्य केले. निकाल जाहीर होताच शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते साहेबराव मोरे, सुधाकर मोगल, भाऊसाहेब तासकर, रतन मटाले, अण्णा निकम, संजय पाटोळे, निवृत्ती घारे, संदीप जगताप, सचिन कड, संपत जाधव, सागर बोराडे, वैभव देशमुख, सचिन पवार आदींनी अभिनंदन केले.

आंदोलनाच्या दणक्याने तत्कालीन सरकारला प्रतिलिटर ५ रुपये भाव वाढवून द्यावे लागले होते. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला, तरी लाखो शेतकऱ्यांना न्याय मिळाला, हे काही कमी नाही. शेतकरीहिताची लढाई अव्याहतपणे सुरूच राहील. – हंसराज वडघुले पाटील.

हेही वाचा:

The post नाशिक : दूध आंदोलनातील सातही आंदोलकांची निर्दोष मुक्तता appeared first on पुढारी.