नाशिक : देणगीरूपी वस्तूंची काळ्याबाजारात विक्री

अनाथगृह www.pudhari.news

नाशिक : नितीन रणशूर
शहरासह ग्रामीण भागात अनाथाश्रमाच्या नावावर नागरिकांना लुटणार्‍या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. भावनिक आवाहन करून नागरिकांना मोठ्या-मोठ्या देणग्यांसह प्रवृत्त केले जाते. मात्र, देणगीद्वारे जमा झालेले धान्य, कपडे, तेल, बिस्किट यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच फर्निचर, टीव्ही, टेबल-खुर्च्या व इतर साहित्यांची काही आश्रमचालकांकडून काळ्या बाजारात सर्रासपणे विक्री केली जाते. त्या माध्यमातून पैसा उभा करून तो स्वत:च्या फायद्यासाठी आश्रमचालक वापरतात. संबंधितांकडून देणगीदारांच्या भावनांशी खेळून अनाथांच्या तोंडचा घासच पळविला जात आहे.

देणगी गोळा करण्यासाठी संबंधित व्यक्ती या क्रेटा, बलेनो, स्विफ्ट, स्कॉर्पिओ यांसारख्या आलिशान चारचाकी वाहनांनी व नव्या कोर्‍या दुचाकीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नियमित फिरत असतात. त्यांचा पेहराव, हातात व गळ्यात धारण केलेले सोने, उंची राहणीमान हे कॉर्पोरेट क्षेत्रालाही लाजवेल असते. गोड बोलण्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांना संमोहित करत मुलांच्या शिक्षणासाठी गणवेश, वह्या, पेन, कंपास, परीक्षा फी, आरोग्यसेवा, खर्च याबरोबर गहू, ज्वारी, तांदूळ, तेल, नाश्ता, मसाला, भाजीपाला, किराणा आदींसाठी एक दिवसापासून महिनाभर खर्च होणार्‍या रकमेची मागणी पाचशेपासून काही हजारांच्या शुभ आकड्यामध्ये असते. अनाथ आश्रमाच्या दैनंदिन वापराच्या वस्तूंसह हंगामानुसार देणगीदारांकडून साहित्य घेतले जाते. त्यात प्रामुख्याने हिवाळ्यात रजईसह ब्लँकेट, गादी, चादरी, स्वेटर यांसारख्या उबदार कपड्यांची मागणी करण्यात येते. तसेच बालकांच्या मनोरंजनासाठी विविध इलेक्ट्रिक साधने तसेच खेळांचे साहित्य देण्याचा आग्रह संबंधित व्यक्तींकडून केला जातो. जमा झालेले साहित्य रातोरात काळाबाजारात विक्रीसाठी पाठविले जाते. त्यातून बक्कळ पैसा मिळविला जातो. या मार्गाने मिळालेला पैसा अनाथ बालकांवर खर्च न होता अन्य ठिकाणी खर्च करण्यात येतो. त्यामुळे देणगीदारांच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातो. दरम्यान, बहुतांश अनाथ आश्रमांमध्ये केवळ पाकीट बंद खाद्यपदार्थ स्वीकारले जातात. बाहेरून तयार खाद्यपदार्थ देण्यास मज्जाव केला जातो. त्या मोबदल्यात विविध वस्तू घेऊन खाद्यपदार्थ जागेवरच बनविले जातात. मात्र, नाश्त्यासह जेवणासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे संबंधित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यातून अनेक निष्पाप बालकांना कुपोषणासारख्या रोगांना बळी पडावे लागते.

देणगीदारांच्या भावनांशी खेळ….
अनाथ आश्रमाला देणगीदार सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सढळ हाताने मदत करतात. आश्रमचालकांच्या मागणीनुसार कधी वस्तू, तर कधी रोख स्वरूपात देणगी दिली जाते. कंपन्यांच्या सीएसआर फंडातून मोठ्या प्रमाणात साहित्य मिळविले जाते. मात्र, देणगीरूपी मिळालेल्या वस्तूंची काळाबाजारात विक्री करून देणगीदारांच्या भावनांचा खेळ मांडला जातो. त्यामुळे देणगी देताना देणगीदारांनी संबंधित अनाथालयासह त्याच्या चालकांची सविस्तर चौकशी करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : देणगीरूपी वस्तूंची काळ्याबाजारात विक्री appeared first on पुढारी.