नाशिक : देवळ्याचा जय बच्छाव ठरला सुपर रॅन्डोनियर

जय बच्छाव www.pudhari.news

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
या वर्षातील 200, 400 व 600 किमी सायकलिंग ब्रेव्हेटसह कोंकण ब्रेव्हेट ही सावंतवाडी, खारेपाटण, कणकवली, पणजी या मार्गावरील 300 किलोमीटरची तीव्र चढउताराची वर्षातील चौथी राइड निर्धारित वेळेच्या आत पूर्ण करून जय बच्छाव याने सुपर रॅन्डोनियर किताब पटकावला. या यशाचा देवळा सायकलिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

फ्रान्समधील डॉक्स क्लब पॅरिसिअन ही संस्था सायकलिंगमधील ‘बीआरएम’चे आयोजन करते. 200, 400, 300 व 600 किमी अशा लांब पल्ल्याच्या चार ब्रेव्हेट एका वर्षात पूर्ण केल्यास सुपर रॅन्डोनियर प्रमाणपत्र एडॉक्स इंडिया असोसिएशनतर्फे दिले जाते. केवळ तीनच महिन्यांत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत, शारीरिक सुद़ृढता, नैसर्गिक अडथळ्यांशी स्पर्धा करणारी कणखर मानसिकता व कठोर मेहनतीच्या जोरावर जय याने हे आव्हान पूर्ण केले. देवळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव यांचा तो मुलगा आहे. वडिलांनी वाढदिवसाला भेट दिलेल्या सायकलवर अविरत सराव सुरू केला. कठोर परिश्रमाच्या जोरावर त्याने सुपर रॅन्डोनियर किताब पटकावून या वर्षाच्या वाढदिवसाची परत भेटच जणू वडिलांना दिली आहे. विशेष म्हणजे देवळा तालुक्यातील पहिला व नाशिकमधील सर्वांत युवा एसआर म्हणून युवकांपुढे आदर्श ठरला आहे.

जय बच्छाव यांनी प्रथम एसआर बहुमान पटकावून देवळा तालुक्याचा गौरव वाढवला. त्याच्या पुढील स्पर्धांसाठी आम्ही पूर्णपणे पाठीशी राहू. – अरुण पवार, अध्यक्ष, देवळा सायकलिस्ट.

पूर्ण केलेल्या चार स्पर्धा अशा…
त्याने नाशिक- येवला- वैजापूर -नाशिक ही पहिली 200 किलोमीटर ब्रेव्हेट निर्धारित साडेतेरा तासांची राइड नऊ तास 55 मिनिटांतच पार केली. दुसरी ब्रेव्हेट 400 किलोमीटरची धुळे- नाशिक -शिरपूर परत धुळे अशी 30 तासांची राइड त्यांनी 22 तास 54 मिनिटांत पार केली. यावेळी मुसळधार पावसाचाही सामना करावा लागला. तिसरी ब्रेव्हेट 600 किलोमीटरची नाशिक – वैजापूर – गंगापूर – पाडळशिंगी – गेवराई बीड – नाशिक अशी 40 तासांची राइड आठ तास आधीच म्हणजे 31 तास 45 मिनिटांच्या विक्रमी वेळेत पूर्ण केली. यावेळी फक्त दोन ते अडीच तासांची विश्रांती त्यांनी घेतली. वर्षातली अखेरची कोकणातील आव्हानात्मक अशा तीव्र चढउतारांची 300 किमीची राइड सावंतवाडीला सुरू होऊन खारेपाटण -कणकवली -ओरोस- पणजी गोवा व परत सावंतवाडी अशी निर्धारित 20 तासांपेक्षा आधीच म्हणजे 17 तास 34 मिनिटांत पूर्ण करून सुपर रॅन्डोनियर किताब त्याने अर्जित केला.

हेही वाचा:

The post नाशिक : देवळ्याचा जय बच्छाव ठरला सुपर रॅन्डोनियर appeared first on पुढारी.