नाशिक : देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांचा आढावा

कोरोना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, ठिकठिकाणी आढावा घेतला जात आहे. राज्य सरकारने मास्कबाबत निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.

सध्या जिल्ह्यात 90 च्या वर कोरोनाबाधितांची संख्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मंगळवारी (दि. 4) जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून आढावा घेतला. कोरोनाचा नवा विषाणू आहे का, याबाबत सर्वेक्षण करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा, याशिवाय जर गेलाच तर त्या ठिकाणी जाताना मास्क लावून जावे अशा स्वरूपाचे आवाहन डॉ. पवार यांनी करत मास्कबाबत संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशभरासह राज्यातही कोरोना रुग्ण वाढत आहे. राज्यातील इतिहास पाहता मुंबई आणि मालेगाव या ठिकाणी कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याचे पाहायला मिळाले होते. विलक्षण पद्धतीने कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली होती. पुन्हा एकदा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठीच खबरदारीचा उपाययोजना राबविण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांचा आढावा appeared first on पुढारी.