नाशिक : दोधेश्‍वर घाटात कारच्या धडकेत विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टर उलटून एक ठार तर ४० जण जखमी

नाशिक

सटाणा (नाशिक); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील दोधेश्वर घाटात सोमवारी (दि.1) सायंकाळी ट्रॅक्टर पलटी होऊन एक ठार, तर जवळपास 40 विद्यार्थी जखमी झाले आहेत. शहरातील बागलाण अकॅडमीतील प्रशिक्षणार्थी श्रावणी सोमवार निमित्त बंदोबस्तासाठी जाऊन परतताना हा अपघात झाला. जखमींना सटाणा ग्रामीण रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दोधेश्‍वर येथील शिवमंदिर सुप्रसिद्ध तीर्थस्थळ असून श्रावणी सोमवारनिमित्त याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बागलाण अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी दरवर्षी बंदोबस्तासाठी जातात. सोमवारी दिवसभर बंदोबस्त करून सायंकाळी परत येत असताना दोधेश्‍वर घाटातील वळणावर ट्रॅक्टर एका कारला धडक देत पलटी झाला. ट्रॅक्टरमध्ये जवळपास 40 हुन अधिक विद्यार्थी बसलेले होते.त्यापैकी एक ठार तर इतर सर्व जखमी झाले. त्यातील काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्या सगळ्यांना रुग्णवाहिकेने सटाणा ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेबाबत माहिती मिळताच सटाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा जाधव, किरण पाटील आदींनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले. आमदार दिलीप बोरसेही घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर मोठी गर्दी झाली होती. तेथे प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी जवळपास 25 हून अधिक विद्यार्थी उपचार घेत होते.

The post नाशिक : दोधेश्‍वर घाटात कारच्या धडकेत विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टर उलटून एक ठार तर ४० जण जखमी appeared first on पुढारी.