नाशिक : दोन वर्षांनंतर महापालिकेत पुष्पोत्सव

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून खंडित झालेल्या महापालिकेच्या पुष्पोत्सवाला यंदा मुहूर्त सापडला असून, पुन्हा एकदा महापालिका मुख्यालय फुलांच्या सुगंधांनी दरवळणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुष्पोत्सवाचे आयोजन करण्याची तयारी उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत सुरू आहे.

प्रथम महापौर शांताराम वावरे यांनी १९९३ मध्ये पुष्पोत्सव आयोजनाची परंपरा सुरू केली. २००८ पर्यंत ही परंपरा अपवाद वगळता अखंडितपणे सुरू होती. मात्र, २००८ मध्ये महापालिकेच्या नगररचना विभागात उघडकीस आलेला कोटेशन घोटाळा आणि त्यात तत्कालीन उद्यान अधीक्षक जी. बी. पाटील यांचा सहभाग यामुळे पुष्पोत्सवाची परंपरा खंडित झाली. २०१८ मध्ये तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पुष्पोत्सवाचे आयोजन करण्याची तयारी केली होती. मात्र, त्याआधीच त्यांची बदली झाली. त्यांच्या पाठोपाठ आयुक्तपदी आलेल्या तुकाराम मुंढे यांनी आर्थिक तरतुदीचे कारण पुढे करत पुष्पोत्सवाच्या आयोजनाला ब्रेक लावला. परंतु मुंढे यांच्या बदलीनंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सकारात्मक भूमिका घेत फेब्रुवारी २०१९ मध्ये पुष्पोत्सवाचे आयोजन करीत पुन्हा या परंपरेला चालना दिली. तत्कालीन उद्यान उपआयुक्त शिवाजी आमले यांनी आयुक्त गमे यांची योजना मूर्त स्वरूपात उतरवली.

२०२० मध्येदेखील ही परंपरा कायम राखली गेली. मात्र, कोरोना महमारीमुळे पुन्हा एकदा ही परंपरा खंडित झाली. दरम्यान, आता कोरोनाचे संकट दूर झाल्याने पुन्हा एकदा पुष्पोत्सवाची तयारी सुरू केली असल्याची माहिती उद्यान विभागाचे उपआयुक्त विजयकुमार मुंडे यांनी दिली आहे.

विविध स्पर्धा, आकर्षक बक्षिसे

पुष्पोत्सवांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसेदेखील दिली जाणार आहेत. नाशिककरांनी या पुष्पोत्सवात सहभागी व्हावे याकरिता सोशल मीडियाची मदतदेखील घेतली जाणार आहे. पुष्पोत्सवांतर्गत गुलाबपुष्पे, कृत्रिम आच्छादनात वाढलेली गुलाबपुष्पे, मोसमी व बहुवर्षीय फुले, कुंडीतील शोभेच्या वनस्पती (बोन्साय व कॅक्टस), पुष्परचना-खुला व शालेय गट, फळे व भाजीपाला (कच्च्या भाज्यांची सजावट), कुंड्यांची सजावट (परिसर प्रतिकृती व तबक उद्यान) आदी स्पर्धा घेतल्या जातील.

हेही वाचा : 

The post नाशिक : दोन वर्षांनंतर महापालिकेत पुष्पोत्सव appeared first on पुढारी.