नाशिक : दोन वर्षांनी मृतांच्या नातलगांना मिळाली नुकसानभरपाई : राष्ट्रीय लोकअदालत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अपघातात जीव गमावल्यानंतर कुटुंबीयांना विमा कंपनीने नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केली होती. मात्र राष्ट्रीय लोकअदालीत ही प्रकरणे निकाली निघाल्याने दोन मृतांच्या नातलगांना एक कोटी २९ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली, तर जखमी शेतकऱ्यास १६ लाख १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. या लोकअदालतीत १३ हजार २८० प्रकरणांचा निपटारा झाला असून, ७३ कोटी ३० लाख ६८ हजार ९४४ रुपयांची तडजोड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयेाजित व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि नाशिक जिल्हा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १३) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित लोकअदालतीत प्रलंबित व दावा दाखलपूर्व अशी एकूण १३ हजार २८० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यात मुख्यत्वे धनादेश न वटल्याप्रकरणी ७४९, बेशिस्त वाहनचालकांवरील ई-चलन कारवाई प्रकरणी नऊ हजार ३५२ प्रकरणांचा निपटारा झाला. अपघातांची २९७, कामगारविषयक २६, कौटुंबिक वादाचे १३३, फौजदारी तडजोडपात्र ५४९ प्रकरणे व इतर ९१७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. यात २०१९ साली मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या दुचाकी व ट्रक अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाला होता. वारसदार व बजाज जनरल विमा कंपनीमध्ये तडजोड होऊन विमा कंपनीने ७० लाख रुपयांची नुकसानभरपाई वारसदारास दिली. दुसऱ्या प्रकरणात २०२० मध्ये अपघाती मृत्यू झालेल्या मुदससीर पटेल यांचे वारस आणि आयसीआयसीआयसीआय लोंबार्ड जनरल विमा कंपनीने तडजोड केली. विमा कंपनीने पटेल यांच्या वारसास ५९ लाख रुपये नुकसानभरपाई दिली. तर २०१९ मध्ये झालेल्या अपघातानंतर गंभीर आजारी असलेल्या शेतकऱ्यासही १६ लाख १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली. वीजचोरीच्या ३६ प्रकरणांचा निपटारा होऊन पक्षकार वीजजोडणीसाठी पात्र ठरले आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शिवाजी इंदलकर व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी न्यायिक अधिकारी, वकील, पक्षकार यांचे आभार मानले.

हेही वाचा:

The post नाशिक : दोन वर्षांनी मृतांच्या नातलगांना मिळाली नुकसानभरपाई : राष्ट्रीय लोकअदालत appeared first on पुढारी.