नाशिक : दोन हजार रुपयांत चौघांना अडीच महिने राबवले

कातकरी कुटुंब,www.pudhari.news

देवगांव, (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी तालुक्यातील गौरी आगीवले मृत्यू प्रकरणामुळे नाशिक जिल्ह्यातील वेठबिगार मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. एकीकडे कमी पैशात आदिवासी, कातकरी बांधवांना राबवून वेठबिगारीसारखे प्रकरण उजेडात येत असतानाच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मोखाडा तालुक्यातील पळसुंडा येथील कातकरी कुटुंबातील चार जणांना चक्क दोन हजारात अडीच महिने राबवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या कातकरी कुटुंबातील चौघांना दोन हजार रुपयांत अडीच महिने राबवून घेत त्यांची पिळवणूक केल्या प्रकरणी खदान मालकावर वेठबिगारी कायद्यांतर्गत श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोखाडा तालुक्यातील पळसुंडा येथील महादू मुकणे वय (60), पत्नी लक्ष्मीबाई (55), मुलगा गणेश (15) व मुलगी सविता (12) हे कुटुंब जून महिन्यात गणेशवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे दगडखाणीच्या कामाला स्थलांतरित झाले होते यावेळी एक ट्रॅक्टर दगड भरण्यासाठी 500 रुपये मजुरी देण्याचे ठरले होते. परंतु खदान मालकाने त्यांच्या अज्ञान पणाचा फायदा घेऊन पिळवणूक केल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.

येथे खदानीत काम करत असताना मालकाकडून जबरदस्तीने अवजड कामे करून घेतली गेली. कामे न केल्यास शिवीगाळ दमदाटी केली जात असे तसेच दोन ते अडीच महिने काम करूनही त्यांना कामाचा मोबदला देखील दिला नसल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे. 2 हजाराच्या दिलेल्या आगाऊ रक्कमेत चार व्यक्तींना अडीच महिने राबवून घेतल्याने अखेर 14 तारखेला काम सोडून घरी जाण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला. परंतु भाड्याला पैसे नसल्याने महादू मुकणे हे तिथूनच पायीपायी निघाले. तर थोडीफार शिल्लक असलेल्या पुंजीतून गणेश, सविता व त्यांची आई लक्ष्मीबाई कसेबसे गाडीभाडे करुन त्यांनी त्र्यंबकेश्वर गाठले. तेथून पायीपायी येत असताना दुपारी 12:30 च्या दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष जवळ नवसू गारे, संतोष निर्गुर्डे, लक्ष्मण खाडे, राजू पालवे या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच संघटनेच्या वरिष्ठ पद्धधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर त्यांनी त्यांच्या वाहनाने मोखाडा पोलीस ठाण्यात त्यांना दाखल केले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित व नाशिक जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे यांनी पीडित कुटूंबाची भेट घेऊन संघटनेच्या पुढाकाराने त्या मालकावर वेठबिगारीचा गुन्हा दाखल केला. यावेळी संघटनेचे विजय जाधव, सीता घाटाळ मोखाडा तालुका अध्यक्ष पांडू मालक आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे करत आहेत.

एकीकडे संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा होत असून त्याचबरोबर देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजाच्या महिला विराजमान झाल्या आहेत. परंतु दुसरीकडे आदिवासी समाजातील आदिम अनेक कातकरी कुटुंब वेठबिगारीच्या पाशात अडकली आहेत. अश्या शेकडो कुटुंबाकडे शेती नाही, घर नाही, शासकीय कागदपत्रे नाहीत स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही या पीडित कुटूंबानी मतदानाचा अधिकार बजावलेला नाही. याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करत श्रमजीवी संघटनेच्या विवेक पंडितांनी खेद व्यक्त केला.

हेही वाचा :

The post नाशिक : दोन हजार रुपयांत चौघांना अडीच महिने राबवले appeared first on पुढारी.