नाशिक : धाडसी चोरीत अडीच लाखांचा ऐवज लंपास

चोरी www.pudhari.news

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा
येथील सिन्नर – शिर्डी महामार्गावर असणार्‍या गणपती मंदिरासमोरील काटे कॉम्प्लेक्समध्ये देवा बॅटरी दुकानातून अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत चोरी केली. चोरट्यांनी दुकानातील शटरचे कडी-कोयंडे तोडत अडीच लाखांचा ऐवज लंपास करून पोबारा केल्याची घटना शनिवारी (दि. 25) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

देवा बॅटरीचे मालक योगेश पाचोरे हे दररोज बहाद्राबाद (पोहेगाव, ता. कोपरगाव) येथून दररोज दुकान चालविण्यासाठी येत येतात. त्यांना वावी येथे सुमारे अडीच वर्ष दुकानात झाली आहेत. रविवारी (दि. 26) पहाटे त्यांचे मावसभाऊ पप्पू काटे हे कंपनीत कामासाठी चालले असता त्यांना या दुकानाचे शटर उघडलेले व सर्व दुकान अस्ताव्यस्त असल्याचे दिसले. त्याचवेळी त्यांनी आपल्या भाऊ योगेश पाचोरे यांना फोन करून चोरी झाल्याच्या घटनेची माहिती दिली. पाचोरे हे तत्काळ वावी येथे येऊन दुकानातील बॅटर्‍या मोजल्या असता, त्यांच्या दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. यामध्ये पाच हजार रुपये किमतीच्या सहा बॅटर्‍या, चार्जिंगसाठी जुन्या दोन हजार रुपये किमतीच्या ग्राहकांच्या 35 बॅटर्‍या, नवे व जुने इनव्हेटर, सीसीटीव्ही कॅमेरा असलेल्या 15 हजार रुपये किमतीच्या नऊ बॅटर्‍या असा एकूण 2 लाख 57 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दुकानातून गायब झाला असल्याची तक्रार मालक योगेश नवनाथ पाचोरे यांनी वावी पोलिसात दिली आहे. वावी पोलिस पुढील तपास करत आहेत.

भुरट्या चोर्‍यांमध्ये वाढ
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वावी येथे भुरट्या चोरांचा धुमाकूळ सुरू असून आहे. शेतकर्‍यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारी, गावासह परिसरातील मोटारसायकली, विजेच्या तारा, जनावरांची चोरी यामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. 15 दिवसांपूर्वी बसस्थानक परिसरातील उपसरपंच सचिन वेलजाळी यांच्या अमृततुल्य चहाच्या दुकानाची इलेक्ट्रॉनिक बोर्ड अंदाजे किंमत 30 हजार लंपास केला असून त्याचाही तपास अजून लागलेला नाही. तोच देवा बॅटरी दुकानाची अडीच लाखांची चोरी नुकतीच झाली असून भुरट्या चोरांची दहशत मात्र वाढत चालली असून यावर पोलिसांनी आळा घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : धाडसी चोरीत अडीच लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.