नाशिक : धानला मिळतोय प्रतिक्विंटल 2,040 भाव

Dhan www.pudhari.com

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी विकास महामंडळाने जिल्ह्यातील पहिले आधारभूत धान खरेदी केंद्र त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू केले आहे. या केंद्रावर प्रतिक्विंटल 2,040 रुपये किमान निर्धारित दराने धान खरेदी सुरू झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 100 रुपये जास्त भाव वाढवून देण्यात आल्याने धान उत्पादक शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महामंडळाकडून उपअभिकर्ता म्हणून त्र्यंबकेश्वर आदिवासी सोसायटीच्या माध्यमातून धान खरेदी करून गणपत बारीतील गोदामामध्ये साठवले जात आहेत.

आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड व आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते धान्य काट्याचे पूजन करून धान खरेदीला प्रारंभ झाला. महामंडळाचे महाव्यवस्थापक जालिंदर आभाळे, बाळासाहेब शिंदे, जयराम राठोड, अविनाश खैरनार, संपत सकाळे, विनायक माळेकर, विमल आचारी, दिनकर मोरे, गणेश कोठुळे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, नवनाथ कोठुळे, बहिरू मुळाणे, बंडू कोरडे, विष्णू बदादे, बाळू गमे, एकनाथ गुंड, काळू भारस्कर, मोहन गावंडे, निवृत्ती लांबे आदी उपस्थित होते. येत्या 31 जानेवारी 2023 पर्यंत धान्य खरेदी सुरू राहणार आहे. मात्र, त्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत शेतकर्‍यांना नावनोंदणी करावी लागणार आहे. खरेदी यंत्रणा, महामंडळ आणि शेतकरी यांच्यात विश्वास निर्माण होईल असे काम करू, असा निर्धार आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका बनसोड यांनी व्यक्त केला. तर धान खरेदी सुरू झाली. आता धान उत्पादक शेतकर्‍यांना बोनसही वेळेत मिळून वाढून मिळाला पाहिजे, अशी भूमिका आमदार खोसकर यांनी मांडली.

मॉइश्चर मीटरचे वाटप…
भातातील ओलावा मोजणारे मॉइश्चर मीटरचे आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड व आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. हे मशीन भातात किती ओलावा आहे, हे काही सेकंदात दाखवते. कार्यक्रमात धान उत्पादक शेतकर्‍यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून योग्य त्या सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे निश्चित करण्यात आले.

हेही वाचा:

The post नाशिक : धानला मिळतोय प्रतिक्विंटल 2,040 भाव appeared first on पुढारी.