नाशिक : धुरळा उडाला… ११ वर्षांनंतर रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार

बैलगाडी शर्यत,www.pudhari.news

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला परवानगी दिल्यानंतर तब्बल ११ वर्षांनंतर शहरात बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवायला मिळाला. बोरगड परिसरातील ठक्कर मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून बैलगाडा स्पर्धक सहभागी झाले होते. तर विजेत्यांना लाखो रुपये किमतीच्या दुचाकीने गौरविण्यात आले.

शर्यतीत वेगाने बैलजोडीचा थरार हा प्रत्येकाच्या अंगावर काटा निर्माण करणारा होता. काही वर्षांपासून बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता ही बंदी नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. याच पार्श्वभूमीवर आ. राहुल ढिकले व म्हसरूळ ग्रामस्थांच्या पुढाकारातून शहरात ११ वर्षांनंतर बैलगाडी शर्यतीचा थरार नागरिकांना अनुभवता आला. खास शर्यतीसाठीच धावणारे खिल्लार, म्हैसुर, गावरान, निळा कोसा, कर्नाटकी खिल्लार, गावरान खिल्लार या प्रजातीचे बैल या शर्यतीत सहभागी झाले होते. जिल्ह्यासह सातारा, सांगली, पुणे, जळगाव येथून बैलगाड्या घेऊन लोक शर्यतीसाठी आले होते. विजेत्या बैलजोडीच्या मालकांना खास दुचाकीचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

शर्यतीसाठी खास चार ट्रॅक

ठक्कर मैदानावर रंगलेल्या या बैलगाडी शर्यतीसाठी खास चार ट्रॅक साकारलेले होते. यासाठी प्रेक्षकांसाठी स्वतंत्र व्यवस्थाही केली होती.

बैलांची घेतली जाते विशेष काळजी

बैलांची ताकद वाढविण्यासाठी व शर्यतीत वेगाने धावण्यासाठी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेतली जाते. त्यासाठी बैलाला पहाटे गहू भरडा, उडीद भरडा दिला जातो. तसेच गावठी तूप, काजू, बदामाचा आहार दिला जातो. तर कोवळ्या उन्हातील बैठकीनंतर हिरवा चारा व दुपारनंतर वाळलेला चारा, पाणी दिले जाते. ज्याने बैल शर्यतीसाठी शारीरिकदृष्ट्या परिपूर्ण तयार होतो. 

हेही वाचा :

The post नाशिक : धुरळा उडाला... ११ वर्षांनंतर रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार appeared first on पुढारी.