नाशिक : नदी-नाल्यांमध्ये यापुढे तळ काँक्रिटीकरणास बंदी

गोदावरी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

नाशिक महापालिका प्रदूषणमुक्त नदी-नाले करण्यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत नाही. याउलट शहरातील अनेक नाल्यांमध्ये सध्या तळ काँक्रिटीकरण सर्रासपणे केले जात असल्याची बाब विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी नदी-नाल्यांमध्ये यापुढे कोणत्याही प्रकारचे बेड काँक्रिटीकरण अर्थात तळ काँक्रिटीकरण करण्यास बंदी घातली आहे. यामुळे आता सुरू असलेली कामे आयुक्त थांबवणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीबाबत याचिका दाखल करणारे निशिकांत पगारे व राजेश पंडित यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. नदी-नाल्यांमध्ये मनपाकडून सर्रासपणे काँक्रिटीकरण केले जात असल्याची बाब निदर्शनास आणून देत शिवशक्ती चौक तसेच कोळावळे मळा या भागातील नाल्यांमध्ये काँक्रिटीकरण केले जात असल्याचे सांगितले. त्यावर विभागीय आयुक्त गमे यांनी नदी-नाल्यांच्या दोन्ही बाजूस गॅबियन वॉल बांधण्यास हरकत नाही. मात्र तळात काँक्रिटीकरण न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन. डी., जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मनपा आयुक्त प्रदीप चौधरी, मनपा उपआयुक्त मनोज घोडे-पाटील, मुख्य अभियंता निर्मिती औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे सुनील पाटील, उपआयुक्त रमेश काळे, उपआयुक्त व्ही. एम. मुंडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गळ, उपसंचालक (माहिती) ज्ञानेश्वर इगवे आदी उपस्थित होते.

सांडपाण्याचे आॅडिट व्हावे

विभागीय आयुक्त गमे म्हणाले की, सांडपाण्याचे ऑडिट करणे गरजेचे आहे. नदीपात्रातून उचलणारे पाणी, प्रक्रिया केलेले पाणी व प्रक्रिया करून पुन्हा नदीत सोडण्यात येणारे पाणी याचा हिशेब देऊन सर्व नद्यांच्या पाण्यासंबंधी ऑडिटची कार्यवाही करावी. महापालिकेने नदीप्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवावे, अशी सूचना त्यांनी केली.

निर्माल्य कलशांची संख्या वाढवा

गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी रामकुंडावर निर्माल्य कलशाची संख्या वाढविण्यात यावी, रामकुंडावर प्लास्टिक पिशव्यांचा वापर रोखण्यासाठी कापडी पिशव्यांचे व्हेडिंग मशीन लावावे. तसेच नाल्यांच्या तळांचे क्राँकिटीकरण करण्यात येऊ नये, अशा महत्त्वपूर्ण सूचनाही गमे यांनी संबंधित यंत्रणांना केल्या.

हेही वाचा : 

The post नाशिक : नदी-नाल्यांमध्ये यापुढे तळ काँक्रिटीकरणास बंदी appeared first on पुढारी.