नाशिक: ननाशीला सर्प दंशामुळे बिबट्या मृत्यूमुखी

बिबट्या www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी): पुढारी वृत्तसेवा
ननाशी वनपरिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील कुहीआंबी शिवारात नर बिबट्याचा सर्प दंशामुळे मृत्यू झाला आहे.

याबाबत वनविभागाकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, शनिवारी (दि. ६) ननाशी वन परिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील कुहीआंबी शिवारातील शेतकऱ्याच्या मालकी जागेत झाडाखाली बसलेल्या अवस्थेत मृत बिबट्या स्थानिक शेतकऱ्यांना आढळून आला. याबाबत स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी तातडीने ननाशी वनपरिक्षेत्र कार्यालयास माहिती कळविली. त्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ननाशीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सविता पाटील आदींसह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. बसलेल्या स्थितीत मृत अंदाजे अडीच ते तीन वर्षे वयाचा नर बिबट्या आढळून आला. वनविभागाच्या वतीने पंचनामा करून उमराळेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तनपुरे यांना घटनास्थळी पाचारण करून खाण्यातून विषबाधा झाली आहे का? याची तपासणी केली मात्र तसे काही आढळून आलेले नाही. अधिक तपासणी केली असता बिबट्याच्या मागच्या उजव्या पायाला सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे शवविच्छेदनातही ४८ तासापूर्वी बिबट्याला सर्पदंश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ननाशी वनपरिक्षेत्रातील रोपवटीकेत मृत बिबट्यावर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा:

The post नाशिक: ननाशीला सर्प दंशामुळे बिबट्या मृत्यूमुखी appeared first on पुढारी.